सुपारी देऊनच मंगेश काळोखेंची हत्या

पोलीस अधीक्षक आचल दलाल यांची माहिती

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोलीतील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. मंगेश काळोखी यांची हत्या सुपारी देऊनच करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे, त्यांना रायगड पोलिसांकडून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात अद्याप तरी सहभाग आढळून आलेला नाही. मात्र, त्याबाबत तपास सुरू असून, तो अंतिम टप्प्यात असल्याचे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी सांगितलं आहे. 26 डिसेंबर रोजी आपल्या मुलीला शाळेत सोडून घरी परतत असताना मंगेश काळोखे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

मंगेश काळोखे हे नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती होते. या हत्येचा सीसीटीव्ही समोर आला होता. याआधी नऊ आरोपी अटकेत होते. पोलिसांनी अजून तीन आरोपींना अटक केल्याने एकूण 12 आरोपींना मंगेश काळोखे हत्येप्रकरणी आतापर्यंत अटक झाली आहे. मंगेश काळोखे यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. कॉन्ट्रॅक्ट किलिंगची ही घटना असून, देवकर यांनी सुपारी देऊन पाच जणांना बोलावलं आणि हा गुन्हा केला. त्यातील दोन आरोपी दर्शन देवकर आणि महेश धायतडक हे आरोपी निष्पन्न झाले आहेत. यातील शेवटचा आरोपी अटकेत येईल त्यावेळी हे चित्र स्पष्ट होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी सांगितले.

सुधाकर घारे यांना का अटक केली नाही?
सध्याच्या पुराव्यात सुधाकर घारे यांना अटकेची गरज नसल्याचे सांगून शेवटचा आरोपी अटक झाल्यावर हत्येचे चित्र स्पष्ट होईल, असे आचल दलाल यांनी सांगितले.
Exit mobile version