उत्पादनात 90 टक्के घट होण्याची भीती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत आंब्याला मोहर चांगल्या पद्धतीने आला. मात्र, बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसला असल्याची माहिती समोर येत आहे. आंबा मोहर करपला गेला आहे. यंदा आंब्याच्या उत्पादनात 90 टक्के घट होण्याची भीती आहे. त्यामुळे आंबा पीक संकटात सापडले असून, यावर्षी फक्त 10 टक्के उत्पादन येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
कोकणात भातशेतीसह आंबा व काजू पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळते. त्यामुळे रायगडसह कोकणात ठिकठिकाणी काजू व आंबा पीक लागवड केली जाते. तरुणवर्ग देखील या लागवडीवर भर देत आहे. कोकणातील आंबा चविष्ट व खाण्यायोग्य असल्याने स्थानिकांसह पर्यटकांकडूनही आंब्याला मागणी प्रचंड आहे. वेगवेगळ्या राज्यातही कोकणातील आंब्याला मागणी आहे. आंबा उत्पादनातून कोट्यवधींची उलाढाल होते. कोकणात आंब्याचे क्षेत्र सुमारे पावणेतीन लाख आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यात आंब्याचे क्षेत्र 17 हजार हेक्टरहुन अधिक आहे. आंबा उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाकडून वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक शेतकरी भातशेतीसह आंब्याची लागवड करण्यावर अधिक भर देत आहेत. यावर्षी पाऊस लांबणीवर गेला असला, तरी आंब्याला मोहर चांगला आला. परंतु, नोव्हेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोहर गळून पडले. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार, फवारणी केली. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर बदलत्या वातावरणामुळे आंब्याचे मोहर करपले असून, त्याचा परिणाम आंब्याच्या उत्पादनावर झाला. आंबा यंदा चांगला येईल, अशी अपेक्षी शेतकऱ्यांना होती. परंतु, आंब्याच्या उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता आहे. आंब्याच्या उत्पादनात यावर्षी 90 टक्के घट होण्याची शक्यता आहे. फक्त हातामध्ये दहा टक्केच आंबा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
हेक्टरी पाच लाख भरपाई द्या!
पर्यावरणाच्या बदलाचा धोका निर्माण झाला आहे.आंबा पीक संकटात सापडले आहे. यावर्षी दहा टक्के उत्पादन येण्याची शक्यता असल्याचा अहवालही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नुकसानीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी शासनाने हेक्टरी पाच लाख रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केली आहे.







