‌‘अवकाळी’मुळे आंबा पीक अडचणीत

बुरशी, तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारी सकाळी अवकाळी पाऊस कोसळला. या पावसामुळे फुललेला मोहर काळा पडण्याची शक्यता आहे. त्याचा आंबा उत्पादनावर परिणाम होऊन तुडतुड्या, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे 14 हजार हेक्टर आंबा लागवडीचे क्षेत्र आहे. त्यात आंबा उत्पादनाचे साडेबारा हजार हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात 50 हजारांहून अधिक आंबा उत्पादक शेतकरी आहेत. या उत्पादनातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत आहे. रायगड जिल्ह्यातील काही आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच वाशी मार्केटमध्ये तयार आंबा विक्रीस नेला असला तरी बहुतांशी बागायतदारांच्या बागेतील कलमे अद्याप मोहरत आहेत. त्यामुळे हा मोहर टिकवण्यासाठी त्यावर करावी लागणारी औषध फवारणी व अन्य उपाययोजना करुनही फलधारणा कशी होते याकडे बागायतदारांचे लक्ष लागले असताना, पुन्हा एकदा पडलेल्या अवकाळीमुळे पिकाला धोका निर्माण झाला आहे. परिणामी, यावर्षी उत्पादन लांबणीवर पडणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात घट होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे बागायदारांच्या चिंतेत भर पडली आहे.

काही बागांमध्ये आंब्याला मोहर येत आहे, तर काही ठिकाणी कैरी तयार होण्याबरोबरच आंबेदेखील तयार झाले आहेत. परंतु, शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे तुडतुड्या, बुरशीजन्य रोग येण्याची भीती आहे. त्यामुळे दहा टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत मोकल, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ

अवकाळी पाऊस फारच कमी पडला आहे . त्यामुळे आंबा उत्पादनावर परिणाम होणार नाही. मात्र दोन दिवसापूर्वी आलेले मोहर गळून पडेल. परंतु शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये.

उज्वला बाणखेले,
अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी
Exit mobile version