मुरूड तालुक्यात यंदा आंब्याचे पीक घटणार

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

डिसेंबरच्या अखेरीस पडलेल्या चांगल्या थंडीमुळे मुरुड तालुक्यातील काही आंबा बागायतदारांच्या बागेतील आंबे चांगले मोहरले. परंतु, फलधारणा होण्याच्या काळात पडलेले धुके व दवाचे वाढलेले प्रमाण पुढे थंडी कमी होऊन हवेत वाढलेल्या तापमानामुळे पडलेल्या कीड रोगाने जळून गेलेला मोहर या काळात काही झाडांना भरपूर पालवी फुटल्याने मोहर लागण्याची शक्यताच मावळल्याने मुरुड तालुक्यातील आंब्याचे पीक घटणार आहे. त्यामुळे येथील आंबा उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांबरोबरच स्थानिक दलाल व व्यापारी संकटात सापडले आहेत.

मुरुड तालुक्यात सुमारे 1590 हेक्टर क्षेत्रावर हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे. निसर्ग चक्रीवादळात 628.82 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले होते. या ठिकाणी नवीन आंबा कलमांची लागवड करण्यात आली असली तरी सदर झाडे मोठी होऊन उत्पादन देण्यास वेळ लागणार आहे. विशेष म्हणजे या काळात येथील भाजी बाजारात जंगलातील रायवळ जातीच्या आंब्यांच्या कैर्‍या विक्रीसाठी येत असतात. या वर्षी मार्च महिना उजाडला तरीदेखील बाजारात येथील आदिवासी महिला अद्याप कैर्‍या विक्रीसाठी आणतांना दिसत नाहीत. त्यामुळे एक तर आंब्यांचे पीक कमी तसेच, आता मोहरत असलेल्या झाडांना कैर्‍या कधी लागणार अशीच चिन्हे दिसत आहेत.

काही ठिकाणी डिसेंबरमध्ये मोहर लागलेल्या झाडांना आता सुपारीच्या आकाराच्या कैऱ्या लागल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेल्या थंडीमुळे आता पुन्हा काही आंब्यांना मोहर लागला आहे. या मोहराला फलधारणा होऊन आंबा तयार व्हायला जून महिना उजाडणार आहे. त्यात हवामानातील बदल व त्याच्या परिणामामुळे त्यावर पडणारे विविध प्रकारचे रोग या सर्वांमुळे फळांच्या वाढीवर होणारा परिणाम लक्षात घेता बागायतदार शेतकऱ्यांच्या हाती प्रत्यक्ष किती पीक येईल याची शाश्‍वती कोणी देत नाही. तोपर्यंत पावसाळा सुरू होणार यात शंका नाही.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यातील काही आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी काही दिवसांपूर्वीच वाशी मार्केटमध्ये तयार आंबा विक्रीस नेला असला तरी बहुतांशी बागायतदारांच्या बागेतील कलमे अद्याप मोहरत आहेत. त्यामुळे हा मोहर टिकवण्यासाठी त्यावर करावी लागणारी औषध फवारणी व अन्य उपाय योजना करुनही फलधारणा कशी होते, याकडे बागायतदारांचे लक्ष लागले आहे. या वर्षी उत्पादन लांबणीवर पडणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात घट होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.


यावर्षी सुरुवातीला मोहरलेल्या झाडांचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे सुरुवातीला मिळणारा भाव बागायतदारांना मिळणार नाही. फेब्रुवारीच्या अखेरीला आलेला मोहर तापमान वाढीमुळे करपून जाण्याची भीती वाटते. फवारणी केली असली तरी थंडी गायब झाल्याने वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसणार यात शंका नाही.

अरविंद भंडारी,
आंबा उत्पादक शेतकरी
Exit mobile version