आठ दिवसांनी करावी लागतेय फवारणी; मोहरगळतीमुळे शेतकरी चिंताग्रस्त
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
थंडीच्या दिवसात आंब्यांना उत्तम मोहर आला आहे. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात थंडीमुळे आंब्यावर तुडतुडा कीडीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे आलेला मोहर वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. आठ दिवसांनी फवारणी करूनसुद्धा कीड नियंत्रणात येत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन करून नवीन औषध उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.
यावर्षी थंडी उत्तम प्रकारे जरी पडत असली, तरीसुद्धा आंब्याच्या मोहरासाठी अनुकूल नसून, शेतकऱ्यांनी आपले मोहर वाचविण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचबरोबर काही आंब्यांना फळधारणा सुरु असतानाच फळगळती सुरु झाली आहे. साधारण एक आंब्यास पाच ते दहा वर्षांच्या एका आंब्याच्या फवारणीसाठी 50 ते 60 रुपये खर्च येतो. त्याचबरोबर 25 ते 30 वर्षांच्या एका आंब्याच्या फवारणीचा खर्च 150 ते 200 रुपये इतका खर्च येतो. तसेच कृषी विभागाकडून कीटकनाशके औषध मिळत असली तरीसुद्धा ती तेवढी प्रभावी पडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी खात्याकडून आंबा बागायतदारांस वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असून, औषध फवारणीसाठी 50 टक्के सबसिडी मिळाली आहे. त्याचबरोबर पुढील आठवड्यामध्ये आंबा मोहर संरक्षण कार्यक्रम होणार असल्याचे समजते.
खानाव व खांबेवाडी येथील दोन्ही आंबा बागेमध्ये तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आहे, त्याचबरोबर सहा वेळा फवारणी झाली असून, आठवड्यातून एकदा फवारणी करावी लागते. मात्र, कीड नियंत्रणात येत नसल्यामुळे आंबा पिकांमध्ये कीड रोगासाठी नवीन संशोधन करण्याची गरज आहे.
–मंगेश धामनसे,
शेतकरी खानाव
सध्या आंबा बागेमध्ये तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून, आम्ही शेतकरी वर्गास दर आठवड्याला दोन औषधे बदली करून वापरणे गरजेचे तसेच लॅबमध्ये पाठवून त्यांचा प्रभाव पाहून वापरण्यास सांगितले. मात्र, ते पुन्हा लॅबमध्ये पाठवून त्यांची गुणवत्ता तपासली जाईल व पुढील आठवड्यात शेतकरीवर्गास आंब्याच्या तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव यासंदर्भात मार्गदर्शन केले जाईल.
-सुनील निंबाळकर,
तालुका कृषी अधिकारी, खालापूर






