फेंगल वादळामुळे हवामानात बदल; आंबा पिकाला फटका बसण्याची भीती
| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
गेले आठवडाभर चांगली थंडी झाल्यामुळे आंबा कलमांना मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मोहर निर्मितीमुळे बागायतदारांच्याही आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, ‘फेंगल’ वादळामुळे थंडी गायब होऊन उकाडा वाढला व ढगाळ वातावरण झाल्याने याचा फटका आंबा पिकाला बसण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.
यावर्षी लांबलेल्या पावसामुळे मुळातच एक महिना आंबा हंगाम लांबला आहे. नोव्हेंबरअखेरीस गुलाबी थंडीची चाहूल लागताच कलमांना मोहर येण्यास सुरुवात झाली. मात्र, भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकलेल्या ‘फेंगल’ चकीवादळामुळे गेले दोन दिवस रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढून अतिरिक्त फवारण्या बागायतदारांना कराव्या लागणार आहेत. यामुळे मुळातच लांबलेला हंगाम अजून लांबण्याची भीती असून, अतिरिक्त फवारण्यांमुळे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.
गतवर्षी ऑक्टोबरअखेरीस व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आंबा कलमांना पहिल्या टप्प्यातील मोहर येण्यास सुरुवात झाली होती. त्या टप्प्यातील मोहरही गतवर्षीच्या एकूण उत्पन्नापैकी 30 टक्के आला होता. यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांपर्यंत मोहर येण्याची प्रक्रिया सुरूच होती. मात्र, यावर्षी मोहर येण्याचा कालावधी लांबल्याने आंबा बागायतदारांना ग्रासले आहे. या बदलत्या वातावरणामध्ये आंबा फळ टिकविणे ही कसोटी आहे. साहजिकच यावर्षी आंब्याची चव चाखण्यासाठी मार्च महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. देवगड तालुक्यासह जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे मोहरावर कीटकांचा प्रादुर्भाव वाढून ‘खार’ पडून मोहर खराब होण्याची भीती आहे. सध्या सुरुवातीच्या टप्प्यातील मोहर येण्याची प्रक्रिया सुरू असून, काही कलमांना पालवीही येत आहे. सदर पालवी परिपक्व होऊन मोहर येण्यास फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
यावर्षी नोव्हेंबरअखेरीस चांगली थंडी पडल्यानेे कलमांना मोहर येण्यास सुरुवात झाल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, फेंगल वादळामुळे गायब झालेली थंडी, वाढलेली उष्णता, तसेच ढगाळ वातावरण यामुळे आंबा मोहरावर तुडतुडे कीटकाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हा प्रादुर्भाव मोहरासाठी अत्यंत धोकादायक असून, फळ उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे. मोहर टिकविण्यासाठी आता फवारणीचे डोस वाढवावे लागणार आहेत.
विद्याधर जोशी,
आंबा बागायतदार- देवगड
पाऊस पडल्यास मोहर काळा पडण्याची व तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. तसेच मोहरावर ‘खार’ पडण्याची प्रक्रियाही काही ठिकाणी सुरू झाली आहे. यामुळे फवारणीवर जास्त खर्च होणार आहे. सध्याचे ढगाळ वातावरण हे मोहरासाठी घातक तर कीटकांच्या प्रादुर्भावासाठी पोषक आहे. मोहर येण्याची सुरुवात चांगली झाली. मात्र, ती टिकविणे गरजेचे आहे. वातावरणाने चांगली साथ दिली तर यावर्षी आंब्याचे उत्पादन चांगले मिळेल.
रूपेश पारकर,
आंबा बागायतदार, वरेरी