थंडी राहील्यास आंबा उत्पादन वेळेत

आगामी आठवडा आंबा बागायतीसाठी महत्वाचा

| रत्नागिरी | वृत्तसंस्था |

दिवसा कडाक्याचे ऊन आणि रात्री गुलाबी थंडी असे वातावरण कोकणात आहे. मात्र अधुनमधून ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. सकाळी ग्रामीण भागात धुके पाहायला मिळते. पुढील आठ दिवस थंडीचा कडाका कायम राहिला तर आंबा उत्पादन वेळेत मिळेल अशी आशा बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.

कोकणातील घाटांमध्ये आताच्या दिवसात रात्री आणि अगदी सकाळी सात वाजेपर्यंत धुक्याने हातपाय पसरलेले दिसतात. धुक्याच्या वाटांमुळे प्रवासाचा वेग मंदावला असला तरी पर्यटकांच्या प्रवासातील गंमत वाढली आहे. पावसाळा वेळेत संपला आणि ऑक्टोबर हीटनेही वेळापत्रक पाळले की, नोव्हेंबर महिन्याची सुरुवात आंबा काजूच्या मोहराच्या दरवळाने होते. नोव्हेंबरपासून थंडी वेळापत्रकानुसार केले तर डिसेंबरच्या मध्यावर कोकणात 17 ते 19 अंश इतके किमान तापमान असते. त्यामुळे मोहराला फलधारणा होते. हे दरवर्षीचे सर्वसाधारण वेळापत्रक. यंदा सप्टेंबरमध्ये पावसाने वेळापत्रकानुसार आपला गाशा गुंडाळला. ऑक्टोबर हीटही वेळेत दाखल झाली आणि परतली. ऑक्टोबर हीटनंतर आंबा काजूची कलमे मोहरली. यंदाच्या आंबा हंगामाला समाधानकारक सुरुवात झाली. त्यानंतर मात्र हिवाळा नाही. डिसेंबर महिना निम्मा उलटून गेला तरी किनारपट्टीवरील तालुक्यांमध्ये पारा 22 अंशांपेक्षा खाली उतरलेला नाही. दापोली, देवरुखसारख्या भागांमध्ये तापमान 15 ते 16 अंशांपर्यंत खाली आले असले तरीही ज्या भागात आंबा पीक मोठ्याप्रमाणात येते. त्या किनारपट्टी भागात मात्र पारा अजून वरच आहे. दिवसा 30 ते 32 अंश इतक्या कडक उन्हाचा अनुभव सध्या रत्नागिरीवासीय घेत आहेत. काही ठिकाणी सुपारीएवढी कैरी लागलेली आहे. त्याचे उत्पादन मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मिळेल. पण जी झाडे आता मोहोरली त्यांना कैरी लागेपर्यंत वेळ लागेल. त्यामधून उत्पादन मिळण्यासाठी एप्रिल महिना उजाडणार आहे.

पारा 18 अंशाखाली जाणे आवश्यक आहे. सध्या आंबा पिकाचे चित्र आशादायी आहे. परंतु आठ दिवसात थंडी पडली पाहिजे. पौष महिन्यातील फुटीला रोग आणि सेटिंग कमी असते. त्यामध्ये वांझ मोहोराचे प्रमाणे अधिक असते. सध्या सुपारीएवढी कैरी साधारपणे 15 मार्चनंतर काढणी योग्य होईल.

डॉ. विवेक भिडे,
आंबा बागायतदार
Exit mobile version