। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
आईटीसी रत्नागिरी ऑरगॅनिक फार्मर ग्रुपच्यावतीने संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाने विद्यामंदिर येथील सभागृहात शाश्वत आंबा उत्पादन कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. या कार्यशाळेला ताम्हाने पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरुवातीला ही कंपनी कोणकोणत्या विषयावर काम करते याची माहिती देण्यात आली. तसेच, प्रथम शेतीमधील अडचणी व नवीन तंत्रज्ञान याचा अभ्यास केला पाहिजे, असा सल्ला कंपनीचे बिझनेस मॅनेजर शैलेंद्र जाधव यांनी यावेळी शेतकर्यांना दिला. या कार्यशाळेला आंध्रप्रदेशवरून आलेल्या ऑरगॅनिक प्रोग्राम मॅनेजर चैतन्या भवानी यांनी विविध राज्यातील शेतीविषयक आपले अनुभव सांगत कोकणातील शेतकर्यांनी कशा पद्धतीने शेतीत काम केले पाहिजे हे सांगितले. तर, पुढील पिढीने करिअर म्हणून शेतीकडे पाहिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. कोकण कृषी विद्यापीठ सेंद्रिय शेती मार्गदर्शक डॉ. संदीप कांबळे यांनी विषमुक्त आंबा शेतीसाठी सर्वोत्तम पद्धत यावर उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, सेंद्रिय पद्धतीने शेती वा लागवड करताना प्रथम त्याची लागवडीची पद्धत समजून घेतली पाहिजे.