मावा, तुडतुड्यासारख्या रोगांच्या प्रादुर्भावाची भीती
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे आंब्यासह कडधान्य पीक अडचणीत आले आहे. या पिकांवर मावा, तुडतुड्यासारख्या कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये आंब्याचे क्षेत्र 16 हजार हेक्टर असून, वाल, हरभरा, आदी भाजीपाला पिकांचे क्षेत्र 13 हजार हेक्टर आहे. पावसाळा संपल्यानंतर वाल, हरभरा, चवळी आदी कडधान्य पिकांची लागवड केली जाते. थंडीचा हंगाम सुरू झाल्यावर आंब्यालादेखील मोहोर येण्यास सुरुवात होते. सद्यःस्थितीत कडधान्य पीक बहरण्याच्या मार्गावर असून, आंबा पिकालादेखील मोहोर येण्यास प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांनी आंबा फवारणीला सुरुवात केली. कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हा प्रयत्न केला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला. रायगड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
जिल्ह्यात आंब्याला मोहोर आला होता. परंतु अवकाळी पावसामुळे मोहोर गळून पडण्याबरोबरच काळा पडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे मावा, तुडतूड्यासारख्या कीडरोगाचा धोका वाढला आहे. कीडरोगांमुळे आंबा उत्पादनाबरोबरच कडधान्य पिकांवरही परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील अलिबागसह काही भागांमध्ये तुडतुड्या फुलकिडाचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मनोज पाटील, शेतकरी
अवकाळी पावसामुळे मोहोरावर परिणाम होत असून, तो काळवंडण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे तुडतुड्या, फुलकिड रोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. त्यामुळे आंबा व इतर पिकांवर त्याचा परिणाम होण्याची भीती आहे.