मनीषा नाईक यांच्या कार्याचा सन्मान

राज्य शासनाकडून एकदिवसीय कार्यशाळेकरिता निवड

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद वरंडे-देवघर शाळेतील शिक्षिका मनीषा रवींद्र नाईक यांची अलिबाग तालुका आयडॉल शिक्षक म्हणून राज्यस्तरीय कार्यशाळेकरिता निवड करण्यात आली आहे. ही एकदिवसीय कार्यशाळा गुरुवार, दि. 4 डिसेंबर रोजी संभाजीनगर येथे पार पडली.

रायगड जिल्ह्यात या कार्यशाळेकरिता पंधरा शिक्षकांची निवड करण्यात आली होती. शासनाकडून कार्यशाळेकरिता निवड करुन सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संपूर्ण आयुष्य शाळा व विद्यार्थी विकासकरिता योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व पालकांना होण्यासाठी तसेच शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने अशा शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी विशेष मोहीम शासनाने हाती घेतली आहे. त्यासाठीच ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सहभाग घेऊन मनीषा नाईक यांनी उपस्थित शिक्षकांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. मनीषा नाईक यांच्या कार्याची शासनाच्यावतीने दखल घेत त्यांना यंदाचा आदर्श शिक्षक हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

Exit mobile version