हरियाणाच्या भुपेंद्र अजनालाला पराभूत करत गदा जिंकली
| सोलापूर । वृत्तसंस्था ।
सोलापुरातील प्रसिद्ध अशी भीमा केसरी सिकंदर शेखने पटकावली आहे. पंजाब केसरी विजेता असलेल्या भुपेंद्र अजनालायास पराभूत करत सिकंदरने सोलापूर जिल्ह्याचा नाव राखला. खा. धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथे या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. शेवटच्या पाच कुस्त्या या महत्वपूर्ण होत्या. हजारो कुस्ती प्रेमी सिकंदर शेखची कुस्ती पाहण्यासाठी सिकंदर टाकळी येथे आले होते. चांदीची गदा,रोख रक्कम असा पुरस्कार सिकंदर शेखने पटकावला आहे.
शेवटच्या पाच कुस्त्या अतिशय महत्वपूर्ण होत्या. गणेश जगताप विरुद्ध अक्षय शिंदे या दोघांच्या लढतीत गणेश जगताप विजयी ठरला. भीमा साखर केसरी कुस्ती स्पर्धेत माऊली जमदाडे विरुद्ध समाधान घोडके अशी लढत झाली. यामध्ये माऊली जमदाडे या पैलवानांने समाधान घोडकेला अस्मान दाखवले. भीमा साखर केसरीचा मानकरी माऊली जमदाडे हा ठरला. उपमहाराष्ट्र केसरी ठरलेल्या महेंद्र गायकवाड यांची पंजाब युनिव्हर्सिटी केसरी विजेता असलेल्या गोरा अजनाला अशी लढत होती. अतिशय चुरशीची लढत झाली. या लढतीत पैलवान गोरा अजनाला हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, पण महेंद्र गायकवाड याने तीन वेळा मैदानात ओढले. आखाड्यात हास्यास्पद वातावरण निर्माण झाले होते.
भीमा केसरीचा मानकरी सिकंदर
हरियाणाचा प्रसिद्ध पैलवान भुपेंद्र अजनाला याची आणि सिकंदर शेख यामध्ये भीमा केसरीची लढत लागली होती.आखाड्यात आजूबाजूला असलेल्या प्रेक्षकांनी फक्त सिकंदर, सिकंदर असे नारे दिल्याने भीमा केसरीच्या अंतिम लढतीत वातावरण टाइट झाले होते. पण बघता बघता सिकंदरने भुपेंद्रला चित केले.