| जालना | प्रतिनिधी |
मराठा आरक्षणाचा अध्यादेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं सांगणाऱ्या जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावातले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता आणखी खालावली आहे. काही वेळापूर्वीच अर्जुन खोतकर यांनी त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी अध्यादेश येईपर्यंत उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. एक दिवसात अध्यादेश आणला गेला तर तो कोर्टात टिकणार नाही असंही गिरीश महाजन यांनी मनोज जरांगेंना समजावून सांगितलं. मात्र त्यांनी उपोषण सोडण्यास आणि आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे.
जालना जिल्ह्यातून सुरू झालेल्या या आंदोलनातील केंद्रस्थानी असणारे मनोज जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्यातील. गेवराई तालुक्यातील माथोरी हे त्यांचे मूळ गाव. शहागड ही त्यांची सासुरवाडी. गेल्या 12 -15 वर्षापासून ते शहागडमध्ये राहतात. माथोरी गावातील हा अल्पभूधारक शेतकरी.
मराठा आंदोलने सुरू झाली तेव्हापासून छोट्या- मोठ्या आंदोलनात सहभागी होणारे, प्रसंगी पुढारपण करता आले तर एखादे भाषण करणाऱ्या जरांगे यांच्या मागे मोठे पाठबळ उभे राहील, अशी शक्यता आंतरवलीच्या आंदोनापूर्वी नव्हती. 2015 पासून गावागावात आंदोलन करण्यासाठी 12 पर्यंत शिकलेल्या जरांगे यांनी विविध आंदोलने केली. अगदी गेल्या काही महिन्यात अनेक गावात उपोषण केले. त्या- त्या गावातील लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी होते.