जरांगे-पाटील म्हणाले, मैं खपाखप बोलता, घोडे लगाता…

जालना । वृत्तसंस्था ।

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचा लढा सुरू आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात त्यांनी २५ ऑक्टोबरपासून पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना बोलणेही अवघड जात आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदी असलेल्या ११ हजार ५०० नोंदी सापडल्या असून त्यांना प्रमाणपत्र दिले जातील, असे स्पष्ट केले. त्यावर अर्धवट आरक्षण घेणार नाही. संपूर्ण आरक्षण घेणार, हाच माझा शब्द आहे. त्यामुळे सर्वांना सरसकट प्रमाणपत्र द्या, असे मुख्यमंत्र्यांना उत्तर दिले. त्याचवेळी एका प्रश्नाला हिंदीत उत्तर देताना मैं खपाखप बोलता, घोडे लगाता…असेही सुनावले.

मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या उत्तरांवर पलटवार केला आहे. आमचे लोक शांततेच आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या वाचाळवीरांना आवरावं, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले. दरम्यान, न्या. शिंदे समितीला मुदतवाढ देण्यास आमचा विरोधच आहे, असेही जरांगे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले. तसेच राज्य सरकारच्या क्युरेटिव्ह पिटिशनचा आमचा काही संबंध नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले.

‘सरकार म्हणत आहे, थोड धीर धरा. पण विश्वास कसा ठेवायचा? पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत येऊनही मराठा आरक्षणावर बोलले नाहीत. तुम्ही त्यांना सांगितले असते तर ते नक्कीच बोलले असते.  तुम्ही पंतप्रधानांना सांगू शकत नाही तर तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा?’ असा सवाल जरांगे-पाटील यांनी केला. त्याचवेळी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी,  मराठा आरक्षण मिळवण्यासाठी एकाचा जीव गेला तरी चालेल, कारण न्याय मिळण्याचा दिवस जवळ आला आहे, अशी प्रतिक्रिया जरांगे-पाटील यांनी दिली. तेव्हा त्यांचे पाणावलेले डोळे पाहून सर्वांना गहिवरून आले.

मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटलं
बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण आलं आहे. अनेक ठिकाणी बस, लाकूड, टायर जाळत सरकारचा निषेध केल्या जातोय. दरम्यान, सरकारला आम्ही जवळपास तीस दिवसांचा वेळ दिला होता. पण त्यांनी काहीच काम केलं नाही. आरक्षणासाठी 62 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. पण सरकारला त्याचं काही देणं-घेणं नाही असं वाटतंय. त्यामुळं आता येथून पुढं आमदार असो की मुख्यमंत्री प्रत्येकालाच मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. तसंच आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मराठा समाजाचं आंदोलन अजून तीव्र होईल, असा इशारा मराठा आंदोलकांकडून देण्यात आलाय.   बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके  यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली. याशिवाय सोळंकेंच्या घराबाहेर  असलेल्या गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर आग इतकी पसरली की त्यांचा अख्खा बंगलाच पेटला. आमदार सोळंके आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुखरुप असल्याची माहिती आहे.  

वंचितच मराठा आरक्षणाला पाठिंबा
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर  यांनी मनोज जारांगे पाटील  यांना लेखी पत्र पाठवून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या पत्रात अतिशय महत्वपूर्ण सूचना प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत.  जोपर्यंत आमदार आणि खासदारांच्या घरासमोर धरणे आंदोलने होत नाही, तोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकार हा प्रश्न गांभीर्याने घेणार नाही आणि ते जागेवरुनही हलणार नाहीत. त्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. दरम्यान मनोज जरांंगे यांनी त्यांच्या प्रकृतीचीदेखील काळजी घ्यावी असे  या पत्रात म्हटले आहे.

 ‘ मराठा आंदोलन भरकटतंय ‘
 सध्या मराठा आंदोलन भरकटत चालले आहे . याचा विचार मनोज जरांगे पाटील, त्यांचे सहकारी आणि  सकल मराठा समाजाने करणे गरजेचे आहे.  या आंदोलनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेमध्ये जे नेते आहेत, त्यांना सुद्धा विचार करण्याची वेळ आहे.  हे आंदोलक हिंसक का होत आहे, याच्या मागे कोण आहे, ज्या आत्महत्या होत आहेत त्या का होत आहेत? याचा विचार मराठा समाजातील नेत्यांनी करायला हवा. जे नेते मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशा भावनेतून काम करत आहेत, त्यांना गावबंदी करुन, आपआपसात मतभेद होऊ लागले, संघर्ष होऊ लागला तर गालबोट लागेल. मराठा समाजाबाबत सहानुभूती आहे, शिस्तीची परंपरा आहे, देशाने शिस्त पाहिली, त्याला गालबोट लागेल. मराठा समाजाबाबत जी सहानुभूती आहे ती कमी होईल, त्यामुळे मराठा आंदोलन यापूर्वी शांततेने झाली त्याला आता गालबोट कोण लावतंय याचा विचार आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे, असे  मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Exit mobile version