मनू भाकर रचणार इतिहास

| पॅरिस | वृत्तसंस्था |

क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठ्या महाकुंभात म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची 22 वर्षीय नेमबाज मनू भाकरसाठी यशस्वी ठरली आहे. या स्पर्धेत तिने आत्तापर्यंत दोन पदके जिंकली असून आता तिने तिसरे पदक जिंकण्याच्यादृष्टीनेही आगेकूच केली आहे.

मनू भाकरने आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरे पदक जिंकले, तर ती ऑलिम्पिकमध्ये तीन वैयक्तिक पदके जिंकणारी एकमेव भारतीय खेळाडू ठरले. तसेच ऑलिम्पिकच्या इतिहासाच एकाच वर्षात तीन ऑलिम्पिक पदके जिंकणारी भारताची एकमेव खेळाडूही ठरेल. तिने महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. शुक्रवारी (दि.2) ऑगस्ट मनू भाकर महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकाराच्या पात्रता फेरीमध्ये सहभागी झाली होती. तिने या पात्रता फेरीमध्ये दुसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. तिने या पात्रता फेरीमध्ये प्रिसिजन स्टेजमध्ये 294 गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर तिने रॅपिड स्टेजमध्ये 296 गुण मिळवले. या स्टेजनंतर ती एकूण 590 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली. याच स्पर्धेत भारताची इशा सिंगही सहभागी झाली होती. पण ती पात्रता फेरीमध्ये 18 व्या क्रमांकावर राहिली. तिने प्रिसिजन स्टेजमध्ये 291 गुणांसह 10 वा क्रमांक मिळवलेला होता. त्यानंतर तिला रॅपिड स्टेजमध्ये 290 गुण मिळवता आले. त्यामुळे एकूण 581 गुण तिला मिळवता आले. यामुळे आता इशाचे या प्रकारातील आव्हान संपुष्टात आले आहे. या प्रकारात पात्रता फेरीमध्ये प्रिसिजन आणि रॅपिड अशा दोन स्टेजमध्ये मिळून एकूण 60 शॉट्स प्रत्येक खेळाडूला मारायचे होते. त्यानंतर सर्वोत्तम गुण असलेल्या अव्वल 8 खेळाडूंना अंतिम फेरीत स्थान देण्यात आले.

मनू भाकरच्या नावे दोन पदके 
मनू भाकरने यापूर्वी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर तिने नेमबाज सरबज्योत सिंग याच्या साथीने मिश्र दुहेरी मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली. ती स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी एकमेव भारतीय आहे.
Exit mobile version