| पॅरिस | वृत्तसंस्था |
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतून भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताची नेमबाज मनू भाकरने कांस्य पदक जिंकत इतिहास रचला. तिने यासह भारताचे पदकांचा खातंही उघडले आहे.
22 वर्षीय मनू भाकरने महिला 10 मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. तिने शनिवारी पात्रता फेरीत तिसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. आता अंतिम फेरीत तिने 221.7 गुण मिळवत पदकावर हक्क सांगितला. मनू भाकर नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी भारताची पाचवी नेमबाज, तर पहिलीच महिला नेमबाज ठरली आहे. यापूर्वी भारताकडून नेमबाजीत राज्यवर्धन सिंग राठोड (2004), अभिनव बिंद्रा (2008), विजय कुमार (2012 आणि गगन नारंग (2012) यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे.
महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकरने स्टेज 1 मध्ये 50.4 स्कोर केला ज्यामुळे ती स्टेज 1 नंतर दुसऱ्या स्थानावर होती. त्यानंतर 13 शॉट्सपर्यंत ती पहिल्या दोनमध्ये होती. मात्र, 15 व्या शॉटनंतर ती तिसऱ्या क्रमांकावर घसरली. 16 शॉट्सनंतर मनूचा स्कोअर 171 झाला होता आणि ती त्यावेळी तिसऱ्या स्थानावर होती. यानंतर मात्र, तिने तिसरे स्थान कायम राखले. अखेर तिने कांस्य पदकावर नाव कोरले.या क्रीडा प्रकारात पहिल्या दोन क्रमांकावर दक्षिण कोरियाचे खेळाडू राहिले. ओ ये जिन हिने 243.2 गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले, तर किम येजी हिने 241 गुण मिळवत रौप्य पदक जिंकले. जिंकल्यानंतर मनू म्हणाली, ‘मला खूप छान वाटत आहे. मी खूप मेहनत घेतली होती. मी माझ्या पूर्ण उर्जेने खेळत होते. कांस्य पदक जिंकले असले, तरी मला आनंद आहे मी देशासाठी जिंकू शकले. मी फक्त त्याक्षणी जे करू शकत होते, त्यावरच लक्ष केंद्रित केले होते. ‘हे पदक सर्वांचं आहे. आमच्या टीमने मिळून यासाठी प्रयत्न केले होते. आशा आहे अजून भारताने पदकं जिंकायला हवेत. मला आत्ता काय वाटत आहे, हे शब्दात सांगणं कठीण आहे.’तिने यानंतर तिच्या कुटुंबाने, प्रशिक्षकांनी आणि स्पॉन्सर्सने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारही व्यक्त केले.