कर्जत नगरपरिषदेचा स्तुत्य उपक्रम ; नवीन मशीनचे नगराध्यक्षांकडून लोकार्पण
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषदेकडून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारे विघटन करून त्यापासून टाकाऊपासून टिकाऊ साहित्य बनविण्याचे काम कर्जत नगरपरिषद करीत असते. आता त्यात प्लास्टिकपासून कच्चा माल बनविण्याचा नवीन उपक्रम सुरू झाला असून, या उपक्रमाच्या नवीन मशिनरीचे लोकार्पण सोमवारी 25 सप्टेंबर रोजी घनकचरा प्रकल्प येथे करण्यात आले.
कर्जत नगरपरिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन केंद्र येथे पालिकेच्या वतीने प्लास्टिक कचऱ्यापासून कच्चा माल बनविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला.टाकाऊ प्लास्टिक आणि अन्य प्रकारच्या प्लास्टिकपासून कर्जत नगरपरिषद यापूर्वी पेव्हर ब्लॉक्स आणि गतिरोधक यांची निर्मिती करीत होते. आता प्लास्टिकवर प्रक्रिया करून कच्चा माल निर्माण करण्याचा प्रकल्प सस्टेनेबल अप्रोच फॉर ग्रीन इनव्हारमेंट या प्रकल्पांतर्गत नगरपरिषद स्वच्छता विभागाकडून राबविला जाणार आहे. या उपक्रमासाठी साधारण 40 लाखांची मशिनरी खरेदी केली असून, तिचे लोकार्पण पालिकेच्या अध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी पालिकेचे विरोधी पक्षनेते शरद लाड, मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेवक विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, नगरसेविका पुष्पा दगडे, वैशाली मोरे, मधुरा चंदन, सुवर्णा निलधे आदी उपस्थित होते. यावेळी प्लास्टिकपासून कच्चा माल बनविण्याच्या प्रकल्पाची माहिती पालिकेचे स्वच्छता अधिकारी सुदाम म्हसे यांनी दिली. यावेळी पालिकेचे अभियंता मनीष गायकवाड, स्वागत विरंबोळे, शहर समन्वयक प्रशांत इंगळे आदींसह नागरिक उपस्थित होते.
पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी प्लास्टिक वापरावर अवलंबून राहणार नाही अशी जनजागृती पालिकेकडून झाली पाहिजे. त्यात एकदा वापरून तो कचऱ्यामध्ये टाकले जाणारे एकल प्लास्टिक यांचा वापर शहरातील नागरिकांकडून होणार नाही, अशी मोहीम सर्वांनी हाती घेतली पाहिजे, यासाठी पालिका पुढाकार घेईल असे आश्वासन दिले.
