पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे नागरिकांना आवाहन
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील साधारण 125 वर्षांपूर्वीचा एल्फिन्स्टन ब्रिज तोडण्यास सुरुवात झाली आहे. याठिकाणी नवा वरळी-शिवडी उन्नत मार्ग दुमजली पूल बांधण्यात येणार आहे. मात्र, याला स्थानिकांचा विरोध कायम आहे. कारण यामध्ये अनेक परिसरातील 19 इमारती बाधित होणार आहेत. त्यामुळे 12 सप्टेंबरच्या रात्रीपासून चोख पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली जात आहेत. एकूण 60 दिवस या पुलाचे तोडकाम चालणार आहे. दरम्यान, या तोडकामाचा मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी सध्याच्या वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल केले असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
एल्फिन्स्टन ब्रिजच्या तोडकामामुळे वाहतूक पोलिसांनी पूर्वेकडून पश्चिमेकडे, आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांची दिशा ठरवली आहे. करीरोड ब्रिजवरील वाहतूक वनवे करण्यात आली असून ही वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे. परेल पूर्वेकडून प्रभादेवी व लोअर परेलकडे जाणाऱ्या वाहनांसाठी करिरोड ब्रिज चालू ठेवण्यात आला आहे. सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा करिरोड ब्रिज वन वे करण्यात आला आहे. तर रात्री 11 नंतर सकाळी 7 वाजेपर्यंत या ब्रिजवरील दोन्ही लाईन चालू असणार आहेत. पूर्वेकडून पश्चिमेला जाणाऱ्या वाहनांकरिता दादर पूर्वकडून दादर पश्चिमेकडे व दादर मार्केटकडे जाणारी वाहने टिळक ब्रिजचा वापर करतील. परेल-भायखळा पूर्व, प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सी लिंकच्या दिशेने जाणारी वाहने चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील.
या भागात नो पार्किंग झोन
प्रभादेवी व लोअर परेल पश्चिमेकडून परेलला, टाटा रुग्णालय, के ई एम रुग्णालयाकडे जाण्यासाठी दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत करी रोडचा वापर करता येईल.कोस्टल रोड, सी लिंकने व प्रभादेवी वरळीकडून परेल भायखळा पूर्वेकडे जाणारे वाहन चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील. ना म जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, भवानी शंकर मार्ग, रावाबहाद्दूर एस के बोले मार्ग, संपूर्ण दोन्ही मार्गिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग नो पार्किंग झोन करण्यात आले आहेत.
20 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी
एल्फिन्स्टन पूल परिसरात 20 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहेत. पूर्नबांधणीचे काम सुरु असल्याने कोणालाही हानी पोहोचू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दोन वर्षे चालणार काम
एल्फिन्स्टन ब्रिज हा प्रभादेवी (West) आणि परळ (East) या भागांना जोडतो. मात्र या ब्रिजवरील नवीन रचणेनुसार हा पूल डबल डेकर बनविण्यात येत असून या पुलाचे काम एकूण दोन वर्षे चालणार आहे.







