बाळासाहेब थोरातांची आयोगावर टीका
| मुंबई | प्रतिनिधी |
काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर तीव्र टीका केली आहे. आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमात अनेक त्रुटी असून निर्णय प्रक्रियेत गंभीर शंका निर्माण होत असल्याचे ते म्हणाले आहेत.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने 21 जानेवारीला आरक्षणाबाबत स्पष्ट निर्देश दिले असून चुकीच्या पद्धतीने पुढे जाऊ नका, असा सल्ला दिल्यानंतरही निवडणूक आयोग हलगर्जीपणे वागत आहे. अचानक निवडणुका रद्द करणे, पुढे ढकलणे यामुळे उमेदवारांपासून ते सामान्य मतदारांपर्यंत सर्वांना त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारांनी महिनोन्महिने प्रचारासाठी परिश्रम घेतले. आता पुन्हा 20 दिवसांचा कार्यक्रम दिला आहे. या विलंबाची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याशिवाय, निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप वाढल्याचा आरोप करताना, थोरात म्हणाले की, पूर्वीचे निवडणूक आयुक्त स्वायत्त होते. सत्ताधारीही त्यांना घाबरत असत. मात्र, आता केंद्रापासून राज्यापर्यंत सत्ताधाऱ्यांच्या सूचनांनुसार काम चालते. त्यामुळे गोंधळ वाढला आहे. असे थोरात म्हणाले. तसेच, या चुकांची शिक्षा जनतेने नव्हे तर आयोगाच्या अधिकाऱ्यांनी भोगावी. निवडणूक प्रक्रियेत साधलेला गोंधळ हा आयोगाच्या चुकीच्या नियोजनाचा परिणाम असून त्यावर कडक कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
