आंबे काढणीतून अनेकांच्या हाताला काम

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मे महिनाअखेर सुरू असून, आंबे काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. रायगड जिल्ह्यातही बागायतदार, व्यावसायिक आंबे काढणीच्या कामात दंग आहेत. आंबे काढणे, त्यांना बॉक्समध्ये ठेवून पॅकिंग करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यातून अनेकांच्या हाताला काम मिळू लागले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये 12 हजारांहून अधिक आंबा उत्पादनक्षम क्षेत्र आहे. जिल्ह्यात आंबा लागवडीवर अनेक शेतकरी भर देऊ लागले आहेत. तरुणदेखील आंबा लागवडीकडे वळू लागला आहे. यंदा आंब्याला मोहोर चांगला आला होता. मात्र ढगाळ वातावरण, अवकाळी पावसामुळे तो गळून पडला. त्यामुळे आंबा उत्पादनावर त्याचा परिणाम झाला. रायगड जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन कमी असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले आहे. आंबा काढणीला सुरुवात झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आंबा काढण्याचे काम केले जात आहे. आंबा काढणीतून अनेकांना रोजगार मिळत आहे. या कामाच्या मोबदल्यात दिवसाला सहाशे ते सातशे रुपये मजुरी कामगारांना दिली जात आहे. काही जण आपल्या कुटुंबियांसमवेत आंबा पॅकिंगचे काम करीत असताना दिसत आहेत.

आंबे काढणीला सुरुवात झाली आहे. यंदा उत्पादनात घट झाली आहे. अवकाळी पावसासह बदलत्या वातावरणामुळे आंब्याला डाग पडले आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांकडून या आंब्यांना मागणी नाही. त्यामुळे डाग लागलेले आंबे स्थानिक बाजारात विक्रीसाठी पाठविले जाणार आहेत.

सुनील घरत,
आंबा उत्पादक

आंबा काढणीला गेल्या पंधरा दिवसांपासून सुरुवात झाली आहे. आंबे काढणे, पॅकिंग करणे या कामांतून अनेकांना रोजगाराचे साधन खुले झाले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे काम सुरू राहणार असल्याने ग्रामीण भागातील महिला, पुरुषांना आर्थिक बळ मिळत आहे.

मनोज पाटील,
शेतकरी
Exit mobile version