| रसायनी | वार्ताहर |
चौक, रसायनी व वावंढळ परिसरात गुरूवारी (दि.12) रात्री आलेल्या वादळ वारा आणि पावसाने अनेकांचे नुकसान केले आहे. यावेळी अचानक कडकडणारी वीज, तुफान पाऊस आणि बेफान वादळ वाऱ्याने वावंढळ परीसरात हाहाकार माजवला होता.
गुरूवारी रात्री अचानक आलेल्या तुफान पावसाने आणि वादळ वाऱ्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तर, वावंढळ गावच्या स्मशानभूमीची निवारा शेड पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. काही घरांवर झाडे पडून त्यांच्या छपरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणच्या विद्युत वाहिनींचे खांब वाकल्याने विद्युत तारा खाली लोंबकळत आहेत. तहसीलदार अभय चव्हाण यांच्या सूचनेनुसार सकाळी मंडळ अधिकारी माणिक सानप आणि तलाठी उदयसिंह देशमुख यांनी नुकसान ठिकाणची पाहणी केली. विद्युत वितरण कंपनीचे अभियंता बोधनकर यांनी कर्मचाऱ्यांसह वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.







