शरद पवार यांचे स्पष्टीकरण
| पुणे | प्रतिनिधी |
माझ्या हातात पुरावा नाही, पण अनेकांच्या मनात शंका आहे की ईव्हीएमद्वारे निवडणुकीत गैरप्रकार होत आहेत. काही जणांनी याबाबत शंका व्यक्त केली आहे, ज्यामुळे निवडणूक आयोगाची भूमिकाही तपासली जावी लागेल. काही जणांनी असे होऊ शकते असे म्हटले आहे. निवडणूक आयोग चुकीची भूमिका घेईल असे वाटत नाही. देशभरात निवडणुका सत्तेचा आणि पैशाचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे ईव्हीएम विरोधात आत्मक्लेष आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या आंदोलाना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी ते बोलत होते.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. निकालानंतर विरोधकांनी मतदारांच्या मतांशी छेडछाड केल्याचा आरोप केला असून, पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, बाबा आढाव यांचे आंदोलन हे जनतेला जागृत करण्याचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. बाबांनी एकट्याने ही भूमिका घेणं योग्य नाही. लोकांनी पण त्यांना साथ दिली पाहिजे, नाही तर लोकशाही धोक्यात येईल. देशाचे सूत्र ज्यांच्या हातात आहेत, त्यांना लोकशाहीशी काही घेणे देणे नाही. विरोधकांना संसदेत बोलू दिलं जात नाही, असेदेखील ते म्हणाले.







