अनेक तालुके सुधारले पण खेड जैसे थै !

खेडमध्ये कोरोनाचा विळखा कायम!
। खेड । प्रतिनिधी ।
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत एप्रिल, मे पाठोपाठ जून महिन्यातही कोरोनाबाधितांचा उच्चांक कायम राहिला आहे. महिनाभरात तब्बल 1009 जणांना कोरोनाची लागण झाली. तब्बल 28 जणांचा कोरोनाने बळी गेला, तालुक्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 197 इतकी झाली. आतापर्यंत तालुक्यात बाधितांची संख्या 5101वर पोहोचली आहे.

कडक लॉकडाऊन होऊनही कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होण्याऐवजी कोरोनाबाधितांसह कोरोनाबळींची संख्या झपाट्याने वाढत राहिल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणा अक्षरश: जेरीस आल्या होत्या. एप्रिल व मे महिन्यात एक हजाराचा टप्पा ओलांडणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येने जून महिन्यातही हा टप्पा पार केला. या महिन्यात 1009 रूग्ण आढळले सद्यस्थितीत 303 रूग्ण सक्रिय असून आतापर्यंत 4601 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शिवतेज कोव्हिड सेंटरमध्ये 48, कळंबणी- 42, नगरपरिषद- 20, डीसीएससी शिवतेज 27 रूग्ण उपचार घेत आहेत.

लोटे विभागात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. ही संख्या 911 वर पोहचली आहे. याखालोखाल आंबवली विभागात 788, खेड नगरपरिषद हद्दीत 687, फुरूस विभागात 566, शिव बुद्रुक विभागात 537, तळे विभागात 414, तिसंगी विभागात 407, कोरेगाव विभागात 370, तळे विभागात 325 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. तालुक्यात कार्यान्वित करण्यात आलेल्या 1071 कन्टेनमेंट झोनपैकी 48 कन्टेनमेंट झोन सद्यस्थितीत कार्यान्वित आहेत.

आतापर्यंत 40 मुलांना कोरोनाची बाधा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत तालुक्यातील सुसेरी नं.1 दिवाळेवाडी येथील 9 बालकांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेची झोप उडाली. यानंतर एकामागोमाग एक कोरोनाबाधित मुले सापडू लागल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता कायम आहे. आतापर्यंत तालुक्यात 40 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व मुलांवर शासकीय कोव्हिड सेंटर, डीसीएससी सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. घरातील व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने या मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले.

Exit mobile version