जलजीवन योजना पूर्ण असूनही ‘हर घर जल’ आलेच नाही
| दिघी | वार्ताहर |
उन्हाळ्यात श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम भागातील गावे व वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यासाठी येथील काही गावात निर्माण होणारी पाणीटंचाई पाहता पंचायत समितीकडून 64 लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत पाणीटंचाई निवारणार्थ टँकरने पाणीपुरवठा व विंधन विहीर बांधण्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. सध्या हा आराखडा जिल्हाधिकार्यांकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावोगावी पाणी योजना राबवल्या, तरीदेखील पाणीटंचाई दूर झालीच नाही.
श्रीवर्धन तालुक्यात पावसाळ्यात सर्वत्र चांगले पर्जन्यमान राहिले तरी अनेक गावांमधून उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. काही गावांमधून निर्माण होणारी पाणीटंचाई पाहता प्रशासनाने 64 लाख रुपयांचा कृती आराखडा प्रस्तावित करुन मंजूर केला आहे. यामध्ये विंधन विहिरी घेणे व गावांमधून टँकरने पाणीपुरवठा करणे या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तालुक्यात सध्या पंचवीस गावे आणि एकतीस वाड्या पाणीटंचाईसदृश्य असल्याने प्रस्तावित उपाययोजना केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेतून तालुका टँकरमुक्त होणे अपेक्षित होते. मात्र, ते स्वप्न अद्यापही अपूर्णच राहिले आहे.
टँकरने पाणीपुरवठ्यासाठी पंचायत समितीकडून मंजूर पाणीटंचाई आराखड्यात त्रेचाळीस लाख रुपये हे सहा टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी मंजूर केले आहेत. दरवर्षी हे टँकरचे नियोजन असते, त्यामुळे श्रीवर्धन टँकरमुक्त कधी होणार, असा प्रश्न विचारला जातोय.
विंधन विहिरींसाठी 30 जूनपर्यंत प्रस्तावित एकवीस विहिरींसाठी एकवीस लाखांची तरतूद केली आहे. खारगाव, कारिवणे कोंड, भारडखोल, कुडकी, खुजारे, भोस्ते, कुंभारआळी, कुडगाव मोहल्ला, बोर्ला, साक्षीभैरी रानवली, सर्वे, दिघी, वडवली, शिस्ते व बोर्लीपंचतन या भागात विहीर बांधण्याचे प्रस्तावित आहे.
नागलोली अंतर्गत सात वाड्यांसाठी जवळपास दोन कोटी रुपयांची जलजीवन योजना राबविण्यात आली. मात्र, निकृष्ट कामामुळे योजनेचा लाभ आम्हाला मिळालाच नाही.
जयेश जाधव, रहिवासी नागलोली
कार्ले आदिवासी वाडीवर पिण्यासाठी पाणी नाही. या समस्येमुळे ग्रामस्थांना वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो. गेली कित्येक वर्षे पाणी मिळण्यासाठी मागणी होत आहे. मात्र, अद्याप लक्ष दिलेच नाही.
शशी पवार, रहिवासी आदिवासीवाडी कार्ले
पाणीटंचाई आराखड्यानुसार शेखाडी, मारळ याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
गजानन लेंडी, गटविकास अधिकारी, श्रीवर्धन