पोस्को कंपनीच्या दुषित पाण्याचा अनेक गावांना वेढा !

कंपनीने निजामपूरला पाणी पुरवठा करण्यासाठी सरपंचाची मुख्यामंत्रांकडे धाव

माणगाव | सलीम शेख |

विळे – भागाड औद्योगिक क्षेत्रातील पोस्को महाराष्ट्र स्टील या कंपनीचे रसायनयुक्त सांडपाणी नदी पात्रात सोडत असल्यामुळे या दुषित पाण्यामुळे या भागातील काळ नदीवर अवलंबून असणाऱ्या अनेक गावातील नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या नदीवर अवलंबून असणाऱ्या सहा ग्रामपंचायतीना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असून या दुषित पाण्यामुळे या भागातील गावात साथीचे रोग पसरत आहेत. निजामपूर व कडापे या ग्रामपंचायतीतील बोअरवेल, विहिरी व काळनदीचे पत्रातील पाणी नमुने शासनांनी वेळोवेळी तपासले आहेत. त्या तपासणी अहवालात हे पाणी दुषित असून ते पिण्यासाठी योग्य नाही. या पाण्यापासून साथीचे आजार उदभवू शकतात असे ग्रामपंचायतीना अहवाल आल्याचे माणगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी लेखी ग्रामपंचायतीना कळविले आहे. हे दुषित पाणी करणाऱ्या पोस्को स्टील कंपनीने आपल्या सीएसआर फंडातून खर्च करून एमआयडीसी शुद्ध पाणीपुरवठा करावा यासाठी निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी निवेदनातून मागणी केली आहे.

निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी या संदर्भात माहिती देण्यासाठी ग्रामपंचायतीत प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. ते म्हणाले कि, भागाड औद्योगिक क्षेत्रातील पोस्को स्टील कंपनी ही कंपनीतील कॉईनवर प्रक्रिया केलेले रसायनिक पाणी कंपनी आवारात असणाऱ्या प्लँन्ट मध्ये साठवून न ठेवता ते पाणी पावसाचा आधार व अंधाराचा फायदा घेऊन तर कधी झाडांना पाणी घालण्याच्या बहाण्यांनी हे पाणी नदी पात्रात सोडले जाते. असेही त्यांनी सांगितले. दोन महिन्यापूर्वी याच कंपनीचे दुषित पाणी कंपनी टँकरद्वारे बाहेर सोडताना पोलिसांनी पकडले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता. कडापे व निजामपूर ग्रामपंचायती कडून दुषित पाणी सोडण्याच्या तक्रारी शासनाला वेळोवेळी करून ही आज तागायत या कंपनीवर कारवाई झालेली नाही.

कडापे, निजामपूर, भाले, कोस्ते खुर्द, साळवे, दाखणे या ग्रामपंचायतीना काळनदीवरून पाणी पुरवठा होतो. मात्र या कंपनीच्या दुषित पाण्यामुळे या भागात खोकला, सर्दी, ताप, जुलाब या सारख्या साथीचे आजार पसरत आहेत. या ग्रामपंचायतीची आर्थिक परीस्थिती नसल्यामुळे नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा होऊ शकत नाही. या गावातील पाणी नमुने शासनांनी तपासणीसाठी पुणे, मुंबई, अलिबाग आदी ठिकाणी पाठवले होते. हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचे अहवाल आल्याने ग्रामपंचायती पुढे मोठा प्रश्न उभारला आहे. निजामपूर ग्रा. पं. ने उपमुख्यमंत्री अजित पवार हे निजामपूर दौऱ्यावर आले त्यावेळी निवेदन देऊन लक्ष वेधले होते. हा प्रश्न उद्योग मंत्र्याच्या अखत्यारीत येत असल्याने ना. सुभाष देसाई, पालकमंत्री आदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे, स्थानिक आ. भरत गोगावले यांना भेटून चर्चा करून प्रश्न सोडवण्याची विनंती केली.

पोस्को कंपनी ही जागतिक कंपनी असून या कंपनीला मिळणाऱ्या उत्पन्नातून सीएसआर फंड एक वर्षाचा दिल्यास या ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. ज्या भागात कंपनी अस्थित्वात आहे. त्या विभागात निधी खर्च न करता जिल्ह्याबाहेर या निधीचा वापर कंपनी करते. या संदर्भात निजामपूर ग्रामपंचायतीने वेळोवेळी खासदार, उद्योगमंत्री, पालकमंत्री व स्थानिक आमदार यांना निवेदने दिली असून लवकरात लवकर एमआयडीसी चे पाणी निजामपूर व कडापे ग्रामपंचायतीला दिले जावे. पोस्को कंपनीपासून कडापे ग्रा. पं हे अंतर दीड कि.मी तर निजामपूर हे ग्रा. पं. हे अंतर सहा कि.मी आहे. या ग्रामपंचायतीला जलवाहिनी टाकून स्वच्छ पाणीपुरवठा करावा अशी मागणी होत आहे.

Exit mobile version