24 फेब्रुवारीपासून राज्यभर रास्तारोको
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षण देण्याची शिफारस केली. ही शिफारस स्वीकारून राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण दिले. विधिमंडळात विशेष अधिवेशनात मंगळवारी कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर करण्यात आलेल्या विधेयकावर मनोज जरांगे पाटलांनी आक्षेप नोंदवून सगेसोयरे तरतुदीवर ठाम भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 23 फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यानुसार, सरकारने सगसोयऱ्यांसदर्भात कायदा केला नाही तर 24 फेब्रुवारीपासून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.
24 फेब्रुवारीपासून प्रत्येक गावात, शहरात सकाळी साडेदहा वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत आंदोलन करायचं आहे. या काळात प्रत्येकाने आपल्या गावात रास्ता रोको करायचा आहे. ज्यांना सकाळच्या वेळी आंदोलन करता येणार नाही, त्यांनी सायंकाळी चार ते रात्री 7 वाजेपर्यंत आंदोलन करायचं आहे. या काळात शांततेत आंदोलन करायचे आहे. जाळपोळ किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेऊन आंदोलन करण्याचे आवाहन जरांगेंनी केले आहे.
दरम्यान, 24 तारखेपासून आपल्या गावत-शहरांत रास्ता रोको केल्यानंतर 3 मार्चला जगातील सर्वांत मोठा रास्ता रोको करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 3 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच जिल्ह्यांत, एकाच ठिकाणी एकाच वेळी (दुपारी 12 ते 1) मोठा रास्ता रोको करायचा आहे. आतापर्यंत अनेक मोठ्या सभा, रॅली आणि आंदोलने झाली. पण एवढा मोठा रास्ता रोको झाला नसेल, असंही मनोज जरांगे म्हणाले.