परप्रांतीयांकडून मराठी कुटुंबावर हल्ला

। ठाणे । प्रतिनिधी ।

चार दिवसांपूर्वी कल्याणच्या अजमेरा हाईट्स इमारतीत अखिलेश शुक्ला नावाच्या परप्रांतीय सरकारी अधिकार्‍याने देशमुख कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली होती. ही बातमी ताजी असतानाच पुन्हा कल्याणमध्येच उत्तम पांडे नावाच्या परप्रांतीयाने एका मराठी पोलीस कुटुंबाला बेदम मारहाण केली आहे. अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे केल्याचा जाब त्या कुटुंबाने पांडेला विचारताच त्याने पोलिसांसह त्याची पत्नी व आईवर हल्ला केला. या घटनेत पोलीस कुटुंब जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, परप्रांतीयांच्या या वाढत्या मुजोरीविरोधात कल्याण-डोंबिवलीत संतापाची लाट उसळली आहे.

अडिवली भागात राहणार्‍या परप्रांतीय उत्तम पांडे (40) याने पोलीस कर्मचार्‍याच्या नऊ वर्षांच्या मुलीला घरात ओढत नेत तिच्यासोबत अश्‍लील कृत्य केले होते. याबाबत तिने पोलीस खात्यात असलेल्या आपल्या वडिलांना घरी जाऊन हा प्रकार सांगितला. त्यामुळे संतप्त झालेल्या या पोलीस कुटुंबाने पांडेला जाब विचारला. त्यावरून मुजोर पांडे व त्याच्या पत्नीने या पोलीस कुटुंबालाच शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढवला. दरम्यान, पांडे व त्याची बायको रिनाने केलेला हल्ला या भागातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या मारहाणीत मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचारी, त्यांची आई व पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उत्तम पांडे व त्याच्या पत्नीची चौकशी सुरू असल्याचे मानपाडा पोलिसांनी सांगितले आहे.

Exit mobile version