कृषीवलच्या वर्धापनदिनाला मराठी साज

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्हाभरातील दिग्गजांची मांदियाळी… शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव… मान्सूननं आगमनाची वर्दी दिल्यानं भरुन आलेले आभाळ.. अशा आल्हाददायक अन्‌‍ उत्साही वातावरणाच्या सोबतीला ‌‘मिस आणि मिसेस कृषीवल’ स्पर्धेचा जल्लोषपूर्ण माहोल… अशा भारावलेल्या वातावरणात दैनिक कृषीवलचा 88 वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि.7) उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला मराठी सिनेअभिनेत्री सई ताम्हणकरची उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. विविध क्षेत्रातील मान्यवरही कार्यक्रमास हजेरी लावली होती. सर्वसामान्य वाचकांशी जोडल्या गेलेल्या दैनिक कृषीवलच्या ॠणानुबंधांची यानिमित्ताने प्रचिती आली. यानिमित्ताने सहभागी झालेल्या स्पर्धकांनी केलेल्या वेशभूषेत मराठमोळी संस्कृतीचा साज पाहावयास मिळाला.



रायगड जिल्ह्यातील दीन-दलित, कष्टकरी, शेतकरी, अन्याय-अत्याचारग्रस्त, वंचितांचा आवाज ठरलेल्या दैनिक कृषीवलचा 88 वा वर्धापन दिन सोहळा अलिबाग शहरातील क्षात्रैक्य समाज हॉल, कुरुळ येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास कृषीवलच्या सल्लागार संचालक सुप्रिया पाटील, व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील, कार्यकारी संपादक माधवी सावंत, सल्लागार संपादक प्रसाद केरकर, आरडीसीसी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, शेकाप महिला आघाडीच्या तालुका प्रमुख प्रीती पाटील, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, नागाव सरपंच हर्षदा मयेकर, माजी सरपंच निखिल मयेकर, आक्षी सरपंच रश्मी पाटील, कृषीवलचे वरिष्ठ संपादक आविष्कार देसाई, सहाय्यक संपादक सुयोग आंग्रे, कृषीवलचे व्यवस्थापक रुपेश पाटील, जाहिरात व्यवस्थापिका हर्षा पाटील व संपादकीय, जाहिरात विभाग, वितरण, बायडिंग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

कलागुणांना वाव
महिलांच्या विकासात आणि सक्षमीकरणात कृषीवल नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे. प्रत्येक क्षेत्रातील महिलांना कृषीवलने साथ दिली आहे. त्यांच्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यांना नावलौकिक मिळवून दिला आहे. याचीच प्रचिती आजच्या मिस आणि मिसेस कृषीवल स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थितांना आली. या स्पर्धेला अलिबाग शहारातील स्पर्धकांनी मोठा प्रतिसाद दिला.
जिल्हाभरातील मान्यवरांकडून शुभेच्छा
स्वर्गीय नारायण नागू पाटील यांनी कृषीवलची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या विचारांचा हा वारसा स्व. प्रभाकर पाटलांनी चालवला. तोच आता आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, सौ. सुप्रिया पाटील, नृपाल पाटील, चित्रलेखा पाटील यांनी चालवला आहे. आज वर्धापनदिनानिमित्त कृषीवलच्या चौथ्या पिढीच्या वारसदारांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांनी उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आणि त्याबद्दल आभारही मानले. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरिकांनी चित्रलेखा पाटील यांच्याशी संवाद साधताना समाजाच्या प्रश्नांसाठी कृषीवलने दिलेल्या योगदानाची आवर्जून आठवण करुन दिली.


Exit mobile version