मराठी भाषा गौरव आणि विज्ञान दिन उत्साहात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमधील चिंतामणराव केळकर विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन व विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दोन्ही विषयांवर अधारित प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेसह विज्ञानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमांची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. शाळेचे पालक ए.ए. सानप यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात पौराणिक, ऐतिहासिक, रहस्यमय, सामाजिक, विनोदी, दशावतारावर अधारित नाटकांचे विविध प्रकार प्रतिकृतींच्या रुपात मांडण्यात आले. वेगवेगळ्या नाटककारांची माहिती तक्ते रुपात सादर करण्यात आली. जुन्या मराठी कवितांचे स्मरण करून देणारा कवितांचा कोपरा तयार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या नाट्य व संगीत क्षेत्रातील कलागुणांना सादर करण्याची संधी देण्यात आली. शाळेच्या ग्रंथालयात असणाऱ्या पुस्तकांचेही प्रदर्शन मांडण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. तसेच विज्ञान दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. रोबोट्स, डीएनए, बीट द बझ, सोलर सिस्टीम वॉर्निंग अलार्म, वॉश युवर हॅन्डस तसेच इतर प्रतिकृती आपली कल्पकता वापरून तयार करण्यात आल्या. गणित विषयातील मजेदार कोडी, खेळ विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष वेधून घेत होते. अंतरिक्ष संदर्भात शनिची कडी गायब का होतात. चंद्राची रोजची बदलणारी स्थिती या विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्तमप्रकारे माहिती सादर केली. अलिबाग शहराचा नकाशाही या प्रदर्शनात मांडण्यात आला होता. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांची, त्यांच्या प्रतिकृती व तक्त्यांच्या अधारे माहिती देण्यात आली. शाळेने भरविलेल्या या प्रदर्शनात उत्तम प्रतिसाद मिळाला.






