मराठमोळ्या अविनाशची तगडी टक्कर

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात मराठमोळ्या अविनाश साबळेने तगड्या स्पर्धकांना टक्कर दिली आणि अंतीम सामन्यात आपली जागा पक्की केली.
अविनाशला त्याच्या गटातील केनियाचा अब्राहम किविबोट, इथोपियाचा सॅम्युअल फिरेवू व जपानचा रियूजी मियूरा या जागतिक क्रमवारीत अव्वल 10 मध्ये असलेल्या खेळाडूंचे आव्हान होते. अविनाश जागतिक क्रमवारीत 15 व्या क्रमांकावर आहे आणि 8 मिनिटे 9.91 सेकंद ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक वेळ आहे. 3 मधून प्रत्येकी 5 असे 15 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार होते. अविनाशने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती आणि अब्राहम व सॅम्युअल त्याच्या मागोमाग होते. पण, 1000 मीटर नंतर अविनाश तिसर्‍या क्रमांकावर ढकलला गेला. जपानच्या खेळाडूने अविनाशला आणखी एक स्थान मागे ढकलले. 2000 मीटर अंतर संपेपर्यंत अविनाशने पुन्हा सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला आणि दुसर्‍या स्थानावर येऊन पोहोचला. मात्र, शेवटच्या लॅपची घंटा वाजली आणि अविनाश मागे पडला. पण, अविनाशने पाचव्या स्थानासह अंतिम सामन्यातील आपली जागा पक्की केली आहे. अविनाश 8 मिनिटे 15.43 सेकंदासह अंतिम फेरीत पोहोचला आहे.

Exit mobile version