| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |
अवघ्या 24 वर्षांची, प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आणि नाट्यनिर्माती रितिका श्रोत्री तिच्या ‘द लाईट कॅचर’ या भावनिक इंग्रजी एकल (एकपात्री) नाटकाने जागतिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहे. ऑगस्टमध्ये लंडनमधील विशेष सादरीकरणानंतर जगातील सर्वात मोठ्या कला महोत्सवात – एडिनबर्ग फेस्टिव्हल फ्रिंज मध्ये नाटकाचे पदार्पण होत आहे. इतक्या जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारे हे पहिले भारतीय एकपात्री नाटक असेल.
भारतभरात 30 हून अधिक विक्री झालेल्या सादरीकरणानंतर, विचारप्रवर्तक आणि दृश्यात्मकदृष्ट्या आकर्षक निर्मिती आता सीमा ओलांडत आहे. भारत आणि यूकेमधील सर्व महिला सर्जनशील टीमच्या पाठिंब्याने, ‘द लाईट कॅचर’ हे थिएटरपेक्षाही जास्त असून, ते विश्वासाची एक हृदयस्पर्शी झेप आहे, जागतिक सहकार्याचे प्रतीक आहे आणि रितिकाचे स्व-निधीने पूर्णत्वास नेलेले स्वप्न ठरणार आहे.
”द लाईट कॅचर” हे केवळ एक नाटक नाही, तर हा एक वैयक्तिक आणि भावनिक प्रवास आहे. नाटककार आणि ए. आय. शास्त्रज्ञ निरंजन पेडणेकर यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शक संकेत पारखे यांच्या दिग्दर्शनातून साकारलेले हे नाटक एका प्रसिद्ध छायाचित्रकार महिलेच्या आत्म शोधावर आधारित आहे. तिचा एक खास फोटो पुन्हा शोधताना ती इथिओपिया, उत्तर कोरिया, युके, भारत अशा विविध देशांतील आठवणींतून फेरफटका मारते. प्रत्येक ठिकाणची एक स्त्री पात्रं रंगमंचावर जिवंत होत जातात आणि हे सगळं एकटी रितिका साकारते. दहा वेगवेगळ्या महिला त्यांची भाषा, देहबोली, भावना आणि जीवनदृष्टी रितिका अत्यंत ताकदीनं आणि संवेदनशीलतेनं साकारते. या सादरीकरणात कमीतकमी नेपथ्य, प्रकाश योजना आणि ध्वनी योजना यांचा वापर असूनही, त्याचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनात खोलवर ठसतो.
नैतिक प्रश्नांची भिडणारी कथा
पुलित्झर पुरस्कार विजेते छायाचित्रकार केविन कार्टर यांच्या गिधाड आणि सुदानी लहान मुलीच्या प्रसिद्ध आणि वादग्रस्त छायाचित्रावरून प्रेरित, हे नाटक अनेक कठीण पण आवश्यक प्रश्न विचारते वेदना पाहणं आणि टिपणं यामधील नैतिक सीमारेषा कोणत्या? एखाद्याचे दुःख अमर करताना आपण काय हरवतो? अशा नैतिक प्रश्नांची भिडणारी कथा असल्याचे रितिकाने सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय गौरव आणि यश
भारतातल्या रेड कर्टन इंटरनॅशनल फेस्टिव्हल आणि थेस्पो युथ थिएटर फेस्टिव्हलसारख्या महत्त्वाच्या व्यासपीठांवर पारितोषिके पटकावणाऱ्या या नाटकाची यूकेमधील नॅशनल स्टुडंट ड्रामा फेस्टिव्हलमध्येही निवड झाली आहे. जगभरातील प्रेक्षकांसमोर हे नाटक सादर होणे, ही केवळ रितिकासाठीच नव्हे, तर आपल्या संपूर्ण भारतीय रंगभूमीसाठी गौरवाची गोष्ट आहे.
लहानपणापासूनच कलात्मक प्रवास
पुण्यातील मराठमोळी मुलगी असलेल्या रितिकाचा कलात्मक प्रवास लहान वयातच सुरू झाला. तिने हिंदी आणि इंग्रजी भाषेतील 15 हून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे, भारताच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून प्रशिक्षण घेतले आहे आणि 12 भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात मीनाक्षी सुंदरेश्वर (नेटफ्लिक्स), बकेट लिस्ट (माधुरी दीक्षितसोबत, तिच्या मुलीची भूमिका साकारत) आणि नुकताच प्रकाशित झालेला रेड 2 हा हिंदी सिनेमा.
यूकेमध्ये कुठे पाहता येईल
लंडन - कॅम्डेन पीपल्स थिएटर, 10 आणि 11 ऑगस्ट, संध्याकाळी 7:15 (+1)
एडिनबर्ग फ्रिंज - द स्पेस ऑन द माइल 3, 18 ते 23 ऑगस्ट, सकाळी 10:00 (+1)
जागतिक व्यासपीठावर एकटीने साकारत असलेल्या ङ्गङ्घद लाईट कॅचरफ या प्रवासाचा साक्षीदार होण्यासाठी यूकेमधील प्रेक्षकांना रितिकाच्या अनेक चाहत्यांकडून आमंत्रित केले जात आहे. जिथे प्रत्येक फ्रेम एक कथा सांगते आणि रितिका त्या कथा एकटी जगासमोर ताकदीने मांडते.
‘द लाईट कॅचर’ हे एकल नाटक माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचे आहे, हे असे काहीतरी आहे जे खरोखर मला माझेच वाटते, हे नाटक मिनिमलिझम आणि कथाकथनाबद्दल आहे ज्यामध्ये प्रकाश आणि संगीत या सारख्या तांत्रिक घटकांचे संयोजन करून एक आकर्षक अनुभव निर्माण केला गेला आहे.
रितिका श्रोत्री,
अभिनेत्री






