दिव्यांगांच्या स्टॉल नूतनीकरणासाठी मोर्चा

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना देण्यात आलेल्या स्टॉलच्या परवान्यांचे नूतनीकरण व अतिक्रमण विरोधी पथकाकडून होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने सोमवारी (दि.23) महापालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.

यावेळी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी नगरसेवक हरेश केणी यांच्यासह मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान अरविंद म्हात्रे यांनी, मोर्चेकऱ्यांची बाजू ठामपणे मांडत दिव्यांगांवर होणारी कारवाई थांबवून त्यांच्या स्टॉलच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याची मागणी केली. यावर अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी विरोधी पक्षनेते, महापौर आणि आयुक्त यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. अरविंद म्हात्रे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे दिव्यांगांच्या समस्या लवकर मार्गी लागतील, अशी अपेक्षा मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी जि.प. सदस्य शेखर शेळके, माजी नगरसेवक रवी म्हात्रे, तुषार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version