। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
गणेशोत्सवामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन रविवारी (दि.15) मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. एकूण 20 एलएचबी डब्यांसह ही गाडी धावणार आहे. गणपती विसर्जनानंतर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने गर्दीनुसार विशेष गाड्यांचे नियोजन करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यानुसार मडगाव ते पनवेल मार्गावर 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता विशेष गाडी (01428) सोडण्यात येणार आहे. तसेच, ही गाडी पनवेलला रात्री सव्वादहा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (01427) पनवेल येथून रात्री पावणेबारा वाजता सुटून दुसर्या दिवशी सकाळी 11 वाजता ती मडगावला पोहोचणार आहे.
विशेष गाडीचे थांबे
करमाळी, थिवी, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव रोड तसेच पेण.