शिवशंभो पाटणेश्वर संघाला उपविजेतेपद; ॠत्विक पाटील ठरला सर्वोकृष्ट खेळाडू
| अलिबाग । प्रतिनिधी ।
तालुक्यात नागाव-पाल्हे येथे शुक्रवार (दि.5) विठ्ठल रखुमाई उत्सवानिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात मरीदेवी धेरंड संघाने शिवशंभो पाटणेश्वर संघाचा पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. त्यांना रोख 21 हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. धेरंड संघाच्या ॠत्विक पाटीलला सर्वोकृष्ट खेळाडूचा बहुमान देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचा शुभारंभ शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता.
पाल्हे ग्रामस्थ मंडळ व वनदेव क्रीडा मंडळ यांनी जय भवानी मित्रमंडळ व सुशांती महिला मंडळ यांच्या सहकार्याने पाल्हे येथे श्री विठ्ठल रखुमाई उत्सव व कबड्डीचे सामने आयोजित केले होते. या कबड्डी स्पर्धेत एकूण 32 निमंत्रित संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात मरीदेवी धेरंड संघाने विजेतेपद पटकाविले. उपविजेत्या शिवशंभो पाटणेश्वर संघास रोख 15 हजार व चषक प्रदान करण्यात आला. तृतीय क्रमांक पटकाविणार्या जय बजरंग बेली संघाला दहा हजार रोख व चषक, तर चतुर्थ क्रमांक पटकाविणार्या गणेश क्लब, उरण संघाचा दहा हजार रोख व चषक देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून धेरंड संघाचा ॠत्विक पाटील, उत्कृष्ट चढाईपटू पाटणेश्वर संघाचा विकी ठाकूर, उत्कृष्ट पकड उरण संघाचा सचित पाटील, तर पब्लिक हिरो म्हणून बेली संघाच्या सुयोग साळगावकर याला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान, बक्षीस वितरण समारंभासाठी जि.प.चे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, नागाव ग्रा.पं. उपसरपंच आरती गुरव, माजी सदस्य राजू मयेकर, सदस्य हर्षदा मयेकर, वरंडे-देवघर ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर चेरकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेचे निरीक्षक हेमंत राऊळ, पंच म्हणून अनिल राऊत, रणजीत तुणतुणे, अविनाश गोंधळी, सचिन पाटील, नवनाथ पोईलकर, महेंद्र नाईक, निकेश मगर, मदन पाटील, जगदीश पोईलकर, सतीश भगत, अभिजीत पाटील, प्रवीण कदम यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन संजय पोईलकर यांनी केले.