बाजार समितींच्या निवडणुकीत चुरस;पाच तालुक्यात मविआ बिनविरोध

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीत रंग चढू लागला आहे. नऊ तालुक्यांमध्ये समित्या अस्तित्वात आहेत. त्यापैकी आतापर्यंत महाड, रोहा, खालापूर, माणगाव, पनवेल या पाच तालुक्यातील बाजार समित्यांवर शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर अलिबाग, पेण, कर्जत आणि मुरुड या तालुक्यातील चार समित्यांमध्ये काही जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. बाजार समितींमध्ये 99 जागांसाठी 197 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 88 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. तर उर्वरित समित्यांमध्ये 101 उमेदवारांमध्ये निवडणूक घेण्यात येत आहे.

अलिबाग – 18 जागासांठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघात 11 जागांसाठी 13, ग्रामपंचायती मतदारसंघात 4 जागांसाठी 6, व्यापारी/आडते मतदारसंघात 2 जागांसाठी 3 तर हमाल/मापारी मतदार संघात बिनविरोध उमेदवार निवडून आला आहे.

पेण – 18 जागासांठी सर्वाधिक 38 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघात 11 जागांसाठी 21, ग्रामपंचायती मतदारसंघात 4 जागांसाठी 9, व्यापारी/आडते मतदारसंघात 2 जागांसाठी 6 तर हमाल/मापारी मतदार संघात एका जागेसाठी 2 उमेदवार उभे आहेत.

कर्जत – 18 जागासांठी सर्वाधिक 25 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघात 11 जागांसाठी 16, ग्रामपंचायती मतदारसंघात 4 जागांवर बिनविरोध, व्यापारी/आडते मतदारसंघात 2 जागांसाठी 4 तर हमाल/मापारी मतदार संघात एका जागेसाठी बिनविरोध.

मुरुड – 18 जागासांठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदार संघात 11 जागांसाठी 13, ग्रामपंचायती मतदारसंघात 4 जागांसाठी 8, तसेच व्यापारी/आडते आणि हमाल/मापारी या दोन्ही मतदार संघात यापूर्वीच बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत.

त्यामुळे आता उर्वरित जागांसाठी लढत होणार असून महाविकास आघाडी विरोधात शिंदे आणि भाजप यांच्यात निवडणूक रंगणार आहे. यासाठी 28 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी करण्यात येणार असून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Exit mobile version