श्रीवर्धनमधील व्यापाऱ्यांमधून समाधान
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरात अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले आहेत. हे दोन्ही सण श्रीवर्धनमध्ये अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरे केले जातात. सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ विविध साहित्यांनी गजबजली असून, खरेदीसाठी नागरिकांची पावले बाजाराकडे वळू लागली आहेत.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने बाजारपेठेत बाळकृष्णाच्या आकर्षक मूर्ती, तांब्या-पितळ व चांदीच्या लहान वाट्या, बासरी, मोरपीस, झुलणारे पाळणे तसेच लहान मुलांसाठी मखमली व जरीकाम केलेले बालकृष्णाचे पोशाख विक्रीसाठी आले आहेत. सोबतच दहीहंडी उत्सवासाठी लागणाऱ्या रंगीबेरंगी गदा आणि हंड्यांनी दुकाने सजली आहेत.
गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याने दुकाने सजली असून, यामध्ये मुख्यत्वे: पर्यावरणपूरक कागदी व कापडी मखर, दिव्यांच्या माळा, कृत्रिम फुले आणि तोरणे, पूजा साहित्याची तयार असे धूप, दीप, कापूर, अत्तर आणि तांब्या-पितळाची समई, मोदकांचे विविध साचे, तांदळाचे पीठ, सुकामेवा तसेच बाप्पाच्या आगमनासाठी लागणारे गुलाल, फटाके आणि पारंपरिक वाद्यांचे साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.
यंदा ग्राहकांचा प्रतिसाद सुरुवातीपासूनच सकारात्मक आहे. विशेषतः पर्यावरणपूरक सजावट साहित्याला यंदा मोठी मागणी आहे. महागाईचे थोडे सावट असले तरी येथे सण साजरा करण्याचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. येत्या दोन-चार दिवसांत खरेदीचा वेग आणखी वाढेल.
रूपेश तिताडे,
पूजा सामग्री भांडार आणि जनरल स्टोअर्स
