संक्रांतीच्या वाणासाठी बाजारपेठा गजबजल्या

पारंपरिक मातीची सुगड उरण बाजारात दाखल

| उरण | वार्ताहर |

संक्रांतीच्या सणासाठी महिलांची बाजारात रेलचेल वाढली आहे. संक्रांतीला वाण देण्याची पद्धत आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. त्यात 10 रुपयांपासून 150 रुपयापर्यंत वस्तू उपलब्ध आहेत.

संक्रांतीचा सण हा प्रत्येक जण वेगळ्याच उत्साहात साजरा करत असतो. प्रत्येकाच्या चालीरीती वेगळ्या असतात. ‘तीळगूळ घ्या गोड गोड बोला’ म्हणत असतानाच काही महिला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करत असतात. याबरोबरच संक्रांतीच्या दिवशी पाच, सात, अकरा, एकवीस याप्रमाणे महिलांना बोलावून वाण देण्यात येते. वाण म्हणजे संक्रांतीनिमित्त भेटवस्तू देणे होय.

उरण बाजारात पारंपरिक मातीच्या सुगड 50 रुपयांस 5 व मोठे 50 रुपयास 2 अशा दराने विकल्या जात आहेत. प्लास्टिक वस्तू 10 ते 50 रुपये, ज्वेलरी बॉक्स 60 रुपये, बास्के 35 ते 70 रुपये, फोल्डिंग बॅग्ज 60 रुपये, मोबाईल कव्हर 20 ते 50 रुपये असे बाजारभाव आहेत.

संक्रांतीच्या साहित्य दरात वाढ संक्रांतीसाठी लागणार्‍या विविध आवश्यक साहित्यांनी बाजारपेठा सजल्या असून, बाजरीचे पीठ, तीळ, तिळगूळ, पांढरे तीळ, गूळ याच्या किमतीमध्ये कमी-अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. साखरेच्या किमतीत वाढ झाली असून, 40 रुपये किलो, तीळ 220 ते 240 रुपये किलो, गूळ 60 रुपये किलो, तीळगूळ 260 रुपये किलो असा दर आहे. मागील वर्षांच्या तुलनेते साखर महाग झाली आहे. त्यामुळे साखरेचे पदार्थ व गुळाचे पदार्थ बनविण्याकडे महिला वर्गाचा कल कमी झाला आहे. साखरेचे तीळगूळ, काटेरी तीळगूळ, खसखसी तीळगूळ, बडीशेपचे तीळगूळ, चुरमुर्‍याचे तिळगूळ, लवग तीळगूळ, कलिंग तीळगूळ, दालचिनी तीळगूळ, मोत्याचे तीळगूळ अशा विविध प्रकारच्या रंगीबेरंगी तिळगुळांनी वातावरणात गोडवा निर्माण झाला असला तरी साखरेचे भाव वाढल्याने महिलांना तिळाची चव कडवट लागत आहे.

सुगड खरेदीसाठी महिलांची गर्दी

| माणगाव | प्रतिनिधी |

मकरसंक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर माणगाव, इंदापूर, गोरेगाव येथील बाजारपेठेत कुंभारवाड्यातून मोठ्या प्रमाणात सुगड विक्रीसाठी आले असून, खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. गेल्या वर्षी ज्या किमतीने म्हणजेच दहा रुपयांना सुगड मिळत होते, तसेच यावर्षी किमतीत कोणताही बदल नसून पन्नास रुपयांना पाच सुगड मिळत आहेत. लहान-मोठ्या आकारातील सुगडींना चांगली मागणी असून, यानिमित्ताने कुंभारवाडे गजबजले आहेत. बाजारातून सुगड विक्री करण्यासाठी विक्रेते येत आहेत. सुगड विक्रीतून चांगला व्यवसाय उपलब्ध होत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सुगडना चांगली मागणी आहे. 50 रुपयांना 5 सुगड उपलब्ध आहेत. यावर्षी लांबलेल्या पावसाने उत्पादन व विक्रीवर थोडा परिणाम झाला. मात्र, पाऊस थांबल्यानंतर मोठ्या प्रमाणात सुगड बनविले, अशी माहिती इंदापूर येथील सुगड विक्रेता सुमित देवरेकर यांनी दिली.

Exit mobile version