इकोफ्रेंडली आकर्षक मखरांना पसंती; थ्रीडी व मेटल थीम मखरांची चलती
| पाली/बेणसे | वार्ताहर |
कोकणातील सर्वांचा लाडका गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणरायाच्या आरास, मखर व सजावटीचे साहित्याने जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. यामध्ये आकर्षक पर्यावरण स्नेही मखरांना मागणी वाढली आहे. विविध थीममध्ये व थ्रीडी प्रकारातदेखील मखर उपलब्ध आहेत. यावर्षी मखरांच्या किमतीदेखील स्थिर आहेत. केवळ मखर विक्री व बनवण्याची लाखो रुपयांची उलाढाल होते.
अनेक सजग व पर्यावरणप्रेमी व्यावसायिक, कलाकार, कारागिरांनी इकोफ्रेंडली मखर बनविले आहेत. तसेच विक्रीसाठी ठेवले आहेत. प्लास्टिक मुक्तीसाठी हे पर्यावरण स्नेही मखर खुपच सहाय्यक ठरत आहेत. विशेष म्हणजे आकर्षक आकार, प्रकार, स्वस्त व टिकाऊ अशा स्वरूपाचे हे पर्यावरणस्नेही मखर असून अनेक नागरिक ते घेण्याला पसंती देत आहेत. प्लास्टिक व थर्मोकोल बंदीच्या निर्णयामुळे इकोफ्रेंडली वस्तुंना मागणी वाढली आहे. थर्माकोलच्या मखरांना पर्याय देण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी अत्यल्प नफा कमवून विक्रेते व कारागीर पुठ्ठ्याचे व कापडी मखर बनविणे व विक्री व्यवसाय करत आहेत.
मेटल थीमवाले पर्यावरणपूरक मखर
जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेतलेले आर्टिस्ट ओमकार कदम यांनी सांगितले की, यंदा मेटल थीम घेऊन पर्यावरणपूरक मखर बनविले आहेत. विशेष म्हणजे हे मखर फक्त पुठ्ठ्यापासून बनवलेले असून ते पाण्यामध्ये सहज विरघळून जातात, ते विघटनशील आहेत. गोल्डन व ब्राऊन ब्लॅक मिक्स कलर त्यावर लॅकर मारल्याने हे मखर अगदी धातूप्रमाणे दिसतात. खूप लक्षवेधी व आकर्षक दिसतात. त्रिशूल, शंकराची पिंड, छत्रपती शिवाजी महाराज, या बरोबर विठ्ठलाची वारी अशा कलाकृतीमध्ये तसेच मंदिराचे सुद्धा मखर उपलब्ध आहेत. मखराची साईज व डिझाईनवर किंमत ठरते. साधारण दोन हजारांपासून ते दहा हजारापर्यंत किमतीत मखर उपलब्ध आहेत.
कापडी मखरांना मागणी
कापडी मखर 33, 45 आणि 56 या साईज मध्ये उपलब्ध आहेत. याची किंमत अनुक्रमे हजार रुपयांपासून पुढे आहे. कापडाच्या दर्जावरून मखराची किंमत ठरते. शिवाय ते सहज दुमडून कोठेही ठेवता येते, धुता येते व अनेक वेळा वापरतादेखील येते. आणि आकर्षकदेखील आहेत.
पर्यावरणस्नेही आकर्षक मखर
राज इको फ्रेंडली मखर स्टॉलचे चालक राकेश गावंड यांनी सांगितले की पुठ्ठा किंवा सनबोर्ड किंवा प्लायवूड, मखमली व जरीचे कापड, गादीचा फोम, कापडी फुले व इकोफ्रेंडली कलर आदी विघटनशील व पर्यावरण स्नेही वस्तूंचा वापर करून हे मखर बनवण्यात आले आहेत. या मखरांचा वारंवार पुनर्वापर करता येऊ शकतो. हे मखर फोल्डेबल असल्याने केव्हाही काढून व्यवस्थित ठेवता येतात व सहज इतरत्र नेता देखील येतात. काही लोक दोनदा वापरून आपल्या नातेवाईकांना देखील देतात.