। नागोठणे । वार्ताहर ।
नाभिक समाजाचे थोर हुतात्मा वीरभाई कोतवाल यांची पुण्यतिथी नाभिक समाजाच्या वतीने 2 जानेवारी रोजी प्रतीवर्षी हुतात्मा वीरभाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना सकाळी 6.10 वा. मानवंदना देऊन सर्वत्र साजरी करण्यात येत असते. त्यानुसार यावर्षीही हुतात्मा वीरभाई कोतवाल यांची पुण्यतिथी नागोठणे शहर व विभागाच्या वतीने उत्साहात साजरी करण्याचे नाभिक समाजाच्या नागोठण्यातील बैठकीत ठरविण्यात आले.
शनिवारी (दि.21) सकाळी 10 वा. संत ज्ञानेश्वर मंदिर येथे हुतात्मा वीरभाई कोतवाल पुण्यतिथीच्या नियोजनासाठी नाभिक समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. यावेळी समाजाच्या विविध विषयांवरदेखील चर्चा विनिमय करण्यात आली.
हुतात्मा वीरभाई कोतवाल पुण्यतिथीच्या नियोजनासाठी नाभिक समाज बांधवांची घेण्यात आलेल्या बैठकीत बाळासाहेब टके, शामकांत नेरपगार, महेंद्र माने, सुधाकर निंबाळकर, दिगंबर खराडे, मिलिंद गुजर,मनोज गायकवाड, जगदीश दिवेकर, महेंद्र पवार,राहुल मोहिते, संदेश मोहीते, दिपक पवार, रविंद्र पवार, संदिप कडू सुशील टके, विलास भोसले, महेंद्र जाधव, रुपेश साळुंखे, दिपक पवार, महेंद्र यादव, राजेंद्र माने आदी समाज बांधव उपस्थित होते.
नाभिक समाज नागोठणे शहर अध्यक्ष सुधाकर निंबाळकर यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, नागोठणे शहर व विभागातील नाभिक समाज बांधवांनी प्रतीवर्षी प्रमाणे समाजाचे मार्गदर्शक भाई टके यांच्या निवासस्थानी एकत्र येऊन तेथून ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणात हुतात्मा वीरभाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांना मानवंदना देण्यासाठी जयघोष करीत प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांनी भाई टके यांच्या निवासस्थानी उपस्थित राहावे असे आवाहनही निंबाळकर यांनी केली.