चिरनेरमध्ये हुतात्मे अमर रहेचा ललकार

जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना शासकीय मानवंदना

| चिरनेर/उरण | वार्ताहर |

गौरवशाली व शौर्यशाली लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचा 93 वा स्मृतिदिन कार्यक्रम सोमवार, दि. 25 सप्टेंबर रोजी चिरनेर गावातील स्मृतिस्तंभाजवळ मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी हुतात्म्यांना शासकीय मानवंदना, सलामी म्हणून उरण पोलिसांकडून बंदुकीच्या 21 फैऱ्या हवेत झाडण्यात आल्या. ब्रिटिश सत्तेविरोधात शांततेच्या मार्गाने लढल्या गेलेल्या रणसंग्रामात उरण तालुक्यातील धाकू गवत्या फोफेकर, नाग्या महादू कातकरी (चिरनेर), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), रामा बामा कोळी (मोठीजुई), मोरेश्वर रघुनाथ शिंदे (न्हावी-कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे) व हसुराम बुद्धाजी घरत (खोपटे) या आठ शूरवीरांना चिरनेर गावातील आक्कादेवीच्या माळरानावर वीरमरण प्राप्त झाले. या रणसंग्रामाच्या स्मृतींना उजाळा मिळावा व युवा पिढीसमोर आपल्या पूर्वजांच्या इतिहासास स्मरण व्हावे यासाठी चिरनेर ग्रामपंचायत व रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (दि.25) साधेपणाने करण्यात आले.

या अभिवादन सोहळ्याला माजी आमदार बाळाराम पाटील, आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, उद्योगपती पी.पी. खारपाटील, उद्योगपती राजेंद्रशेठ खारपाटील, शिवसेनेचे उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उरणचे माजी सभापती भास्कर मोकल, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे मुकुंद गावंड, भाजपचे रवीशेठ भोईर, उरणच्या उपसभापती शुभांगी पाटील, चिरनेर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या शीतल घबाडी, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, शेकापचे सुरेश पाटील, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, संतोष ठाकूर, ज्येष्ठ नेते भूषण पाटील, भाजपचे रमेश फोफेरकर, सुशांत पाटील, चिरनेर ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. मिंडे, चिरनेरचे ग्रामविकास अधिकारी महेश पवार, चिरनेर गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, राजिपचे माजी सदस्य महेंद्र ठाकूर, पोलीस पाटील संजय पाटील, माजी सरपंच संतोष चिर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, शिवधन पतसंस्थेचे चेअरमन गणेश म्हात्रे तसेच तालुक्यातील ग्रामपंचायतींचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, परिसरातील ग्रामस्थ, हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक, प्राथमिक शाळेचे व हायस्कूलचे विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान प्रथेप्रमाणे हुतात्म्यांच्या व स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमास्थळी न करता, त्यांच्या निवासस्थानी जाऊन चिरनेर ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आला. दरम्यान, चिरनेर ग्रामपंचायत प्रशासन, उरण पंचायत समिती आणि रा. जि. प. अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र भगत यांनी केले.

अधिकाऱ्यांची कार्यक्रमाकडे पाठ
इतिहास प्रसिद्ध चिरनेर गावातील जनतेला अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागत असून, गावावर पूरपरिस्थितीचं संकट ओढावत आहे. तरी राज्य सरकार, केंद्र सरकार देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या चिरनेर गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने ग्रामस्थांनी यावर्षी हुतात्मा स्मृतिदिन कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी यावर्षीही रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषद, उरण पंचायत समिती, उरण तहसील कार्यालयातील अधिकारी उपस्थित न राहिल्याने चिरनेर गावातील ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली आहे.

Exit mobile version