हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान शहरातील क्रांतिकारक भाई कोतवाल हे देशासाठी हुतात्मा झाल्याने महाराष्ट्र शासनाने त्यांचे उचित स्मारक माथेरान येथे बांधले आहे. दरम्यान, याच माथेरान शहराच्या दर्शनी भागात असलेल्या हुतात्मा भाई कोतवाल स्मारक परिसराला टाकाऊ वस्तूंनी गराडा घातला आहे. त्याचवेळी पालिकेच्या माध्यमातून असे टाकाऊ साहित्य तेथे टाकण्यात आल्याने स्वातंत्र्यसैनिक धोंडू पवार यांचे चिरंजीव गिरीश पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

माथेरान मध्ये 1935 पासून देशात राज्य करीत असलेल्या ब्रिटिशांविरुद्ध येथील देशप्रेमी आणि देश स्वातंत्र्य करण्याच्या इराद्याने पेटून उठलेले तरुण एकत्र आले होते. 1942च्या लढ्यात याच माथेरान शहरातील 20 हून अधिक तरुणांनी महात्मा गांधी यांनी पुकारलेल्या ‌‘चले जाव‌’ आंदोलनात सहभाग नोंदवला होता. देशाच्या या स्वातंत्र्य लढ्यात 2 जानेवारी 1943 रोजी हौतात्म्य पत्करणारे भाई कोतवाल यांचे उचित स्मारक राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांच्या माध्यमातून 1984 मध्ये उभे राहिले. या स्मारकात हुतात्मा भाई कोतवाल यांची जयंती 1 डिसेंबर तर त्यांचा बलिदान दिन 2 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या स्मारकाचे पावित्र्य राखण्याचे कार्य माथेरानमधील राज्यकर्त्यांनी सातत्याने ठेवले आहे. परंतु, मागील दोन वर्षे माथेरान शहरात असलेल्या प्रशासक राजवटीत याच हुतात्मा स्मारक परिसराला डम्पिंग ग्राउंड आणि गोदाम केले गेले. माथेरानमधील जनतेचे स्फूर्तिस्थान असलेल्या हुतात्मा स्मारक परिसरात टाकण्यात आलेल्या आणि साठवून ठेवलेल्या टाकावू वस्तू यामुळे या वास्तूचे पावित्र्य नष्ट झाल्याची भावना निर्माण झाली आहे. तेथे नगरपरिषदकडून वापरलेल्या वस्तू अस्ताव्यस्त टाकण्यात आल्या असून माथेरान नगरपरिषदेच्या पर्यावरण पुरक इ-रिक्षा देखील गेले वर्षभर उभ्या करून ठेवल्या आहेत. त्याचवेळी या वस्तू कोणतेही नियोजन नाही अशा प्रकारे कुठेही जागा उपलब्ध आहे तेथे टाकण्यात आल्याने हुतात्मा स्मारक परिसर टाकावू वस्तूंचे डंपिंग ग्राउंड बनले आहे. याबाबत माथेरान स्वातंत्र्यसैनिक धोंडू पवार यांचे पुत्र गिरीश पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Exit mobile version