डिकसळ येथून सिद्धगडकडे मशाल

40 किलोमीटर अंतर पार
| नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधून रायगड आणि ठाणे जिल्ह्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. डिकसळ येथील समांतर प्रतिष्ठान आणि तरुणांनी डिकसळ ते हुतात्म्यांचे बलिदान झालेले स्थळ सिध्दगड अशी मशाल फेरी काढली. दरम्यान,या मशाल फेरीचे नेरळ येथील हुतात्मा स्मारक आणि मानीवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे स्वागत करण्यात आले.

तालुक्यातील माथेरान येथील भाई कोतवाल आणि मानिवली येथील हिराजी पाटील या आझाद दस्त्यामधील दोन क्रांतिकारक यांना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे 2 जानेवारी 1943 रोजी हौतात्म्य प्राप्त झाले होते.या बलिदान दिनाचा स्मृतिदिन दोन्ही जिल्ह्यात मोठ्य प्रमाणावर साजरा होत असतो.अनेक गावातून मशाल या सिद्धगड येथे पोहचत असतात.यावर्षी कर्जत नेरळ रस्त्यावरील डिकसळ गावातील तरुणांनी समांतर प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून मशाल फेरीने डिकसळ ते सिद्धगड जाण्याचा निर्णय घेतला होता.एक जानेवारी रोजी सायंकाळी डिकसळ येथे जेष्ठ ग्रामस्थ वसंत पाटील यांच्या हस्ते क्रांती ज्योत प्रज्वलीत करण्यात आल्यानंतर मशाल फेरीला सुरुवात झाली.

40 किलोमीटर अंतर पार करीत असताना या क्रांतिज्योतीचे नेरळ येथील हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारक समिती यांच्याकडून स्वागत करण्यात आले. त्यावेळी वयोवृध्द परंतु तरुणांना ऊर्जा मिळावी म्हणून साथ देणारे वसंत पाटील,तसेच तरुण कार्यकर्ते मंगेश पाटील आणि नेरळ येथील मृणाल खेडकर,माथेरान येथील चंद्रकांत काळे यांचे हस्ते हुतात्मा चौकात हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.तर स्मारक समितीकडून क्रांतिज्योतीचे पुष्पहार घालून समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी स्वागत केले. यावेळी गणेश पवार,सुमित क्षीरसागर आणि मशाल फेरीत सहभागी तरुण हजर होते.

ही मशाल फेरी हुतात्मा चौकातून नेरळ गावात हुतात्मा हिराजी पाटील चौकात पोहचली.तेथे अभिवादन करून माथेरान नेरळ कळंब रस्त्याने मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे पोहचली. पुढे म्हसा धसई रस्त्याने जांबुर्डे येथे पोहचली.जांबूर्डे येथून सिद्धगड हा जंगलातील रस्त्याने प्रवास करीत सिद्धगड येथील पायथा येथे पोहचली.

Exit mobile version