अदानीविरोधात मुरुडकर आक्रमक; महावितरणला निवेदन सादर
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
म्हसळा तालुक्यातील पाभरा गावातून मुरुड तालुक्याकरिता विद्युतपुरवठा दिला जातो. यामधूनच आता मुरुडकरच्या हिश्श्यातील वीजपुरवठा अदानी ग्रुप आगरदांडा-दिघी पोर्टकरिता दिला जाणार आहे. याला ‘आम्ही मुरुडकर’चा विरोध असून, यासंदर्भात मुरुड महावितरणचे सहाय्यक अभियंता महेंद्र राठोडा व कनिष्ठ अभियंता सुनील खरात यांच्याकडे निवेदन देण्यात आले. याची प्रत तहसीलदार, पोलीस ठाण्यासही देण्यात आली आहे.
अदानी ग्रुप आगरदांडा-दिघी पोर्टकरिता विद्युतपुरवठा देऊ नये, दिला तर मोठे जनआंदोलनास सामोरे जावे लागेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भविण्याची शक्यता आहे. याकरिता आम्हाला जेलमध्ये जायला लागले तरी चालेल, केसेस अंगावर घेऊ, पण मुरुडकरांच्या हिश्श्यातला विद्युतपुरवठा कोणालाच दिला जाणार नाही, असा रोखठोक इशारा यावेळी आम्ही मुरुडकरच्या वतीने महावितरण विभागाला देण्यात आला आहे.
यावेळी मंगेश दांडेकर, प्रमोद भायदे, फरोज घलटे, ललित नरसिंगमल जैन, आदेश दांडेकर, सचिन शहा, इम्तियाज मलबारी, इस्माईल शेख, विजय सुर्वे, नितीन पवार, महेश कारभारी, जाहिद फकजी, विजय पैर, प्रशांत कासेकर, गजानन भुसाणे, शशिकांत फुलांरे, रिझवान संदिलकर, तनझीम कासकर आदींसह आम्ही मुरुडकर सदस्य उपस्थित होते. सविस्तर असे आहे की, मुरुड तालुक्यामध्ये एकूण 74 गावांसह अनेक वाड्या वस्त्या असून, तालुक्यातील प्रणाली अद्याप सुस्थितीत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तालुका निसर्ग समृद्ध असल्यामुळे विशेषतः येथील सर्व उद्योग हे पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत. या ठिकाणी असलेले रुग्णालय, डायलेसीस सेंटर, निदान केंद्र आदींसह हे सर्व विजेवर अवलंबून आहेत. जर चुकून विजेचा दाब कमी झाला तर सर्व कारभार ठप्प होतो. तर कधी कधी रुग्णांना अलिबागला पाठवावे लागते. असे अनेक प्रश्न विजेच्या समस्याने निर्माण होतात. याला जबाबदार कोण? तरी या गंभीर प्रश्नाकडे महावितरण कंपनीने विचार करावा, असे आवाहन करण्यात आले.
आगरदांडा -दिघी बंदराचा विकास अदानी समूहाकडे हस्तांतरण झाल्यानंतर बंदराच्या पायाभूत सुविधा, विद्युतपुरवठा, रेल्वे आणि रस्ते यांचाही विकास करण्यात येणार आहे, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले होते. परंतु, अदानी समूहाने तालुक्यातील प्रशासनाबरोबर तसेच लोकप्रतिनिधींबरोबर कोणतेही समन्वय न ठेवल्यामुळे रस्ते व अनेक पायाभूत समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कंपनीतर्फे विद्युत प्रणाली विकसित केली जाईल म्हणून सबस्टेशन निर्मिती करण्यासाठी पाच एकर जागा महावितरण कंपनीला दिली. परंतु, या ठिकाणी सबस्टेशननिर्मिती न करता अदानी समूहाच्या मागणीनुसार सध्या मुरुड येथील असलेल्या स्वीच स्टेशन प्रणालातून आगरदांडा-दिघी येथील अदानी समूहाला वीज देण्याची तरतूद महावितरण महामंडळ करीत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
यामुळे तालुक्यात पुन्हा विद्युत पुरवठासारखा सारखा खंडित होत राहील व यामुळे पर्यटन व्यवसाय व आरोग्य यंत्रणेला मोठा फटका बसणार आहे. तसेच फ्रिज, टिव्ही, पंखे आदी उपकरणांमध्ये बिघाड होऊन नागरिकांना नुकसानीला सामोरे जावे लागेल. आज मुरुड तालुक्यासाठी 18 हजार मेगावॅट वीज आपल्याला मिळत आहे तरी ही मुरुडला विजेची समस्या जाणवत आहे. जर अदानी समूहाला वीजपुरवठा दिल्यास, तर मुरुडच्या नागरिकांना रात्रीच्या वेळी रॉकेलचा दिवा लावावा लागेल. तरी अदानी समूहाने स्वतःचे सबस्टेशन बनवावे आणि विद्युतपुरवठा आपल्या कंपनीकरिता घ्यावा, आमच्या हिश्श्यातील विद्युतपुरवठा घेऊ नये. आम्हाला रस्त्यावर उतरणास भाग पाडू नये, असे आवाहन आम्ही मुरुडकर यांच्यामार्फत करण्यात आले आहे.