आधुनिक तंत्रा वापर करून आंब्याचे भरघोस उत्पादन

। पोलादपूर । वार्ताहर ।
पोलादपूर तालुक्यातील सडवली येथील सेवानिवृत्त पोलीस शेतकर्‍यांने आंबा पिकाचे भरघोस उत्पादन घेतले. नामदेव कृष्णा जाधव हे मुंबई पोलीसमध्ये नोकरी करत असताना त्यांनी तालुका कृषी अधिकारी पोलादपूर कार्यालयाच्या सहकार्याने मौजे सडवली गावामध्ये आंबा या पिकाची लागवड केली होती. परंतु अपुर्‍या मशागतीमुळे त्यांना दरवर्षी अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळाले नाही. मे 2021 पासून तालुका कृषी अधिकारी पोलादपूर कार्यालयातील कृषी सहाय्यक अनिल वलेकर यांच्या मार्गदर्शनाने जाधव यांनी खत व्यवस्थापन करण्याचे ठरवले. जून 2021 मध्ये नवनियुक्त कृषी पर्यवेक्षक भरत कदम यांच्या मार्गदर्शनाने जून 2021 मध्ये बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या शिफारशीप्रमाणे खत व्यवस्थापन करण्यात आले. ऑॅगस्ट 2021 मध्ये शिफारशीप्रमाणे कल्टारचा उपयोग करण्यात आला. या खत व्यवस्थापनाने जाधव यांच्या बागेला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चांगला मोहोर आला. सदर बागेला विद्यापीठाच्या वेळापत्रकाप्रमाणे फवारणीदेखील करण्यात आली व जाधव या शेतकर्‍यांनी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडयात आंबा फळाची काढणी चालू केली व सदर फळाची विक्री मुंबई व पोलादपूर परिसरामध्ये चांगल्याप्रकारे चालू आहे. जाधव यांच्या सहकार्याने गावातील इतर शेतकर्‍यानी देखील या वर्षी कल्टारचा वापर करून आपल्या बागेतून चांगले उत्पादन घेतले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून तालुक्यातील शेतकर्‍यांनी मार्गदर्शन घेऊन आपल्या बागेतून भरघोस उत्पादन घ्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एन.वाय.घरत यांनी केले आहे.

Exit mobile version