अलिबागमध्ये मसाज व फिजिओथेरपी प्रशिक्षण केंद्र

सक्षम करणे हीच खरी मानवतेची पूजा – अनिरुध्द खाडीलकर

। अलिबाग । प्रतिनिधी ।

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड, महाराष्ट्र संस्था संचलित नॅब रायगड मसाज सेंटर, अलिबाग येथे दृष्टीबाधीत प्रवर्गातील महिला व पुरुषांना मसाज, अ‍ॅक्युप्रेशर, फिजिओथेरपीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायासाठी सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून संस्थेच्या इमारतीत एक मसाज सेंटर सुरू केले आहे. दृष्टीबाधीतांना सक्षम करणे हीच खरी मानवतेची पूजा करणे असे प्रतिपादन थळ येथील आरसीएफचे कार्यकारी संचालक अनिरुध्द खाडीलकर यांनी केले. आरसीएफ कर्मचारी वसाहतीमधील मसाज व फिजिओथेरपी प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्‍वर कलंत्री, मानद महासचिव गोपी मयूर, सहसचिव डॉ. मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी डॉ. शाम कदम, आर.सी.एफ.चे महाप्रबंधक संजीवजी हरळीकर, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ पवार, डॉ. शुभदा कुरतडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला नॅब अलिबागचा ऍक्टिव्हिटी सेंटरच्या संचालिका वृंदा थत्ते यांनी सर्व पाहुण्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करून प्रशिक्षण केंद्राची माहिती दिली. रामेश्‍वर कलंत्री, गोपी मयूर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना दृष्टीबाधीत महिलांनी तयार केलेल्या व कधीच न कोमजणारा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या कलात्मक कलांचे दर्शन घडविले. नॅब महाराष्ट्राच्या कार्याच्या स्थापनेपासूनच आजतागायत अलिबाग येथील नॅब उपकेंद्राच्या 2002 पासूनच्या कार्याचा आढावा घेऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शिक्षण व त्याच्या पुनर्वसना संदर्भातील योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी डॉ. शाम कदम यांनी सांगितले की, दिव्यांग कल्याण हा समाज कल्याण विभागाचा एक अंग आहे. नॅब संस्थेचे दृष्टीबाधीतांचे कार्य पाहून ही संस्था अलिबाग मध्ये 2002 पासून कार्य करत असून दृष्टीबाधीतांना सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देऊन जीवनात उभे राहण्याचे सामर्थ्य निर्माण करीत आहे, ही प्रेरणादायी आहे. संस्थेच्या कार्यास व प्रशिक्षणार्थींना समाज कल्याण विभागाकडून ज्या योजना आहेत, त्यांचा लाभ देण्याबरोबर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

डॉ. शुभदा कुरतडकर यांनी मसाज प्रशिक्षण देऊन दृष्टीबाधीत महिलांना व पुरुषांना कसे सक्षम केले त्याची माहिती देत प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मीना मनोज जैन यांनी पाच हजार रुपये व कमळ नागरी पतसंस्थेच्या वतीने संस्थेला पंधरा हजार रुपयांचा धनादेश संस्थेच्या संचालिका वृंदा थत्ते यांना देणगी म्हणून देण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार नॅब महाराष्ट्राचे सहसचिव डॉ. मुक्तेश्‍वर मुनशेट्टीवार यांनी केले.

Exit mobile version