निवड समिती माजी अध्यक्षांचा आरोप
| मुंबई | वृत्तसंस्था |
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार्या टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा झाली आहे. टीम जाहीर होताच त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णमाचारी श्रीकांत यांनी या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. 2011 साली वर्ल्ड कप विजेतेपद पटकावणार्या भारतीय टीमची निवड श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखालील समितीनेच केली होती. त्यानंतरच्या 13 वर्षांमध्ये भारतीय संघाला फक्त एका आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आलेले आहे. श्रीकांत यांनी निवड समिती पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे.
टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या टीममध्ये चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतूराज गायकवाडचा समावेश न केल्याने श्रीकांत संतापले आहेत. ऋतुराज या आयपीएलमध्ये सातत्याने रन्स करतोय. त्यानंतरही त्याची वर्ल्ड कपसाठी निवड झालेली नाही. त्यामुळे श्रीकांत नाराज आहेत. शुभमन गिलचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी टीम मॅनेजमेंटवर पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे. गिल कोणत्याही प्रकारात चांगला खेळत नसतानाही त्याला संधी मिळत होती, असं श्रीकांत यांनी म्हंटले आहे.
श्रीकांतने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले, मशुभमन गिल पूर्णपणे आऊट ऑफ फॉर्म आहे. तरीही त्याची टीममध्ये का निवड केलीय? ऋतुराज गायकवाड दावेदार आहे, यामध्ये कोणतीही शंका नाही. त्याने 17 इनिंगमध्ये 500 पेक्षा जास्त रन काढले आहेत. त्याचबरोबर त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकही झळकावलं आहे. शुभमन गिल निवड समितीचा आवडता खेळाडू आहे. तो फेल गेला तरी त्याला संधी मिळते. टेस्ट, वन-डे आणि टी मध्ये अयशस्वी होऊनही त्याला जागा मिळाली आहे. निवडीमध्ये मोठा पक्षपात आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड या सिझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्याने 10 मॅचमध्ये 63.63 च्या सरासरीने आणि 146.68 च्या स्ट्राईक रेटने 509 रन काढले आहेत. यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. गायकवाड ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहे. तर गिलने या सिझनमध्ये साधारण कामगिरी केली आहे. त्यानं 10 मॅचमध्ये 35.56 च्या सरासरीने 320 रन केले आहे. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 140.96 असून त्याने दोन अर्धशतक झळकावले आहेत.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (व्हाईस कॅप्टन), शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान







