सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
। सोलापूर । वृत्तसंस्था ।
बार्शी तालुक्यातील घारी गावात आज सकाळी फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारखाना मालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
बार्शी तालुक्यातील घारी गावापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता कि, या स्फोटाचे हादरे सहा किलोमीटरपर्यंतच्या गावांना बसले आहेत. तसेच, या कारखान्यात आसपासच्या परिसरातील 15 महिला मजूर काम करतात, परंतु वटपौर्णिमाची सुट्टी आणि नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे आठ दिवसांपासून हा कारखाना बंद होता. त्यामुळे एकही कामगार त्याठिकाणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, या स्फोटात लाखोंचे फटाके जळाल्याने कारखाना मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पांगरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, ते पुढील कारवाई करत आहेत.