खोपोलीत भीषण स्फोट; लाखोंचे नुकसान

। खोपोली । संतोषी म्हात्रे ।
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या रुंदीकरणाचे काम बोरघाटात सुरू आहे. रुंदीकरणात अडथळा ठरणारे दगड सुरुंगाचे स्फोट करून उडवले जात आहेत. स्फोट केल्यानंतर मोठमोठे दगड बाजूलाच असलेल्या ढेकू गावात पडल्याने यापूर्वी अनेक घरांचे नुकसान झाले आहे. स्फोट करणार्‍या कंपनीकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने सोमवारी (दि.7) पुन्हा स्फोटाचे दगड सूरज पाटील यांच्या गुरांच्या गोठ्यावर पडल्याने नुकसान झाले असून स्थानिकांमध्ये संताप आहे.

अनेकदा झालेल्या घटनांमध्ये जीवितहानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी झाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात बैठकाही झाल्या आहेत. पोलिसांनी कंट्रोल स्फोट करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या असतानाही स्फोट करताना पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे या घटनेमुळे पुन्हा समोर आले आहे.

ढेकू येथील सूरज पाटील यांच्या गोठ्यावर स्फोटामूळे उडालेले मोठमोठे दगड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. पाटील यांच्या गोठ्यात गिरगाई असून सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
दगड पडले तेव्हा कुणीही नसल्याने जीवितहानीही टळली. वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असताना संबंधित कंपनी दुर्लक्ष करत असल्याने ढेकू गावातील ग्रामस्थांचे बळी घेतल्यानंतर कंपनीला जाग येईल का, असा संतप्त सवाल सूरज पाटील यांनी केला आहे.

फकॉन या ठेकेदार कंपनीची बाजू समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष कंपनीच्या साईट कार्यालयाला भेट दिली असता कुणीही बोलण्यास तयार नसल्याने कंपनीची बाजू समजू शकली नाही. दरम्यान सूरज पाटील यांनी याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Exit mobile version