औषध कंपनीला भीषण आग

| ठाणे | प्रतिनिधी |

अंबरनाथमधील आनंदनगर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठी आग लागली. यावेळी रसिनो फार्मा या रासायनिक कंपनीला ही आग लागली. रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या कंपनीत असलेले रसायने यांच्यामुळे आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. कंपनीतून काही रसायने बाहेर वाहून आल्याने शेजारच्या दोन कंपन्यांनाही आगीची झळ बसली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या वतीने सुरू होते. रेसिनो ड्रग प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दालाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास सुरुवात केली. कंपनीतून रसायने बाहेर वाहून येत असल्याने शेजारच्या कंपन्यांनाही आगीची झळ बसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच कंपनी बाहेरच्या नाल्यामध्ये रसायन पसरल्याने येथेही काही काळ भडका उडाला होता. त्यामुळे येथे गोंधळाची स्थिती होती. रात्री अकरा वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले नव्हते. मात्र भीषण आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.

Exit mobile version