। जळगाव । प्रतिनिधी |
शहरातील औद्योगिक वसाहतीत एका केमिकल कंपनीला शुक्रवारी (दि.14) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक मोठी आग लागली. परिसरातील नगर परिषदांच्या बंबांद्वारे आग विझविण्याचे काम करण्यात आले. आगीत जीवितहानी झाली नसली, तरी वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
औद्योगिक वसाहतीत आर. एल. चौफुलीजवळ एन सेक्टरमध्ये आर्यव्रत केमिकल कंपनी आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कंपनीतील कामगार नेहमीप्रमाणे कामात व्यस्त असताना, अचानक भीषण आग लागली. आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी महानगरपालिकेसह जैन इरिगेशन तसेच वरणगाव, भुसावळ, जामनेर, नशिराबाद नगर परिषदांचे अग्नीशमन बंब दाखल झाले. संबंधित जवानांनी आग विझविण्यास तातडीने सुरूवात केली. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीचे कारण तसेच झालेल्या आर्थिक नुकसानीची माहिती घेतली. भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र, केमिकल कंपनीतील तयार व कच्चा माल तसेच इतर महत्त्वाचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्टसर्किटची शक्यता व्यक्त केली जात आहे. औद्योगिक वसाहत पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरातील बंदोबस्त वाढवला.







