। मुंबई । प्रतिनिधी ।
कुर्ला सीएसएमटी मार्गावरील किस्मत नगरातील खलील शेख चाळीत गुरुवारी (दि. 27) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत चाळीतील 30 झोपड्या, गोदाम जळून खाक झाली. त्या घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असली तरीही सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
चाळीत आग लागताच रहिवाशांनी तात्काळ सुरक्षितस्थळी पळ काढला. सुरुवातीला रहिवाशांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. मात्र, ते अपुरे पडत असल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाला दुर्घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. त्याचबरोबर पोलीस, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी व विजेचे वितरण करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
आगीची तीव्रता सातत्याने वाढत असल्याने अग्निशमन दलाने आगीला रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास क्रमांक दोनची वर्दी दिली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 13 गाड्या व अन्य अद्ययावत यंत्रे घटनास्थळी तैनात करण्यात आली होती. दरम्यान, आग विजेच्या तारा आणि विद्युत यंत्रणेच्या संपर्कात आल्याने आगीची मोठा भडका उडाला. त्यांनतर आगीला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास क्रमांक तीनची वर्दी देण्यात आली. सुमारे 100/150 चौरस फूट जागेत पसरलेल्या आगीत भंगार, लाकडाचे गोदाम जळून खाक झाले. तसेच, अनेक झोपड्याही जळून खाक झाल्या. प्रयत्नांची पराकाष्ठा करत मध्यरात्री अडीचच्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कुर्ल्यातील गोदामाला भीषण आग

fire isolated over black background